वणी शहरात मुख्य व अंतर्गत रस्त्यावर खड्डे व घाणीचे साम्राज्य *
डुकरांचा सुळसुळाट * वणीकर त्रस्त * नगरपालिका पहाते नागरिकांचा अंत*
सुरेंद्र इखारे वणी – शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तसेच रस्त्यावर असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे विविध आजारांना तसेच अपघातांना सामोरे जावे लागत असताना सुद्धा शहराच्या विविध समस्येकडे नगरपालिका प्रशासन हेतुपुरस्सर पणे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे असल्याने डुकरांचा मुक्तसंचार दिसून येत आहे. तसेच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी चा त्रास होत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शहरातील मुख्यरस्त्यावरील खड्डयांमुळे अपघात होत आहे टिळक चौक ते आंबेडकर , टागोर चौक, सुर्योदय चौक, सुभाषचंद्र बोस चौक काठेड आईलमिल ते दीपक टॉकीज चौक ,गांधी चौक ते गाडगेबाबा चौक जत्रा रोड अशा विविध ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या प्रमुख मार्गावर बँका असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे कोणीही कुठेही वाहने उभी करीत असल्याने येनाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत आहे.परंतु शहरातील पोलीस विभाग प्रभारावर असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा फज्जा उडाला आहे.त्यामुळे नियंत्रणासाठी व्यवस्था नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी दिसून येत आहे. एकंदरीत रस्त्याची दुरवस्था व घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण झाले असून विविध समस्यांना बळी पडत आहे याकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे . आतातरी मुख्याधिकारी यांनी नागरिकांचा अंत पाहू नये अशी संतप्त प्रतिक्रिया वणीकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे तेव्हा वरिष्ठांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.