खरीप काढणे व रब्बी लावण्याच्या हंगामात वाघोबाची दहशत
शेतकरी तसेच खान कामगार विवंचनेत
वनविभागाला लक्ष देण्याची गरज।
सुरेंद्र इखारे वणी – तालुक्यात वाघोबाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी,शेतमजूर ,नागरिक व कामगार भयभीत झाले आहे. शेतामध्ये उभे पीक असताना पीक काढण्यासाठी जाणाऱ्या मजुरांची हिंमत होत नाही आहे. तेव्हा शेतकऱ्याला शेतात असणारा माल कश्या पद्धतीने काढावा व खान कामगारांना वाटायला लागले आहे की आता नोकरी कशी करायची तर आता चार चाकी वाहना शिवाय पर्याय नाही अशा विवंचनेत परिसरातील शेतकरी , शेतमजूर , खान कामगार आहेत . संपुर्ण वणी परिसर कोळश्याच्या खाणीने वेढल्याने वाघ कधी रांगना, भुरकी, कोलेरा, पिंपरी, ब्राम्हणी, उकणी, चिखलगाव, डोंगरगाव, कोसारा, सिंधीवाढोना, मेंढोली, केसुरली, तर कधी खान परिसरात वाघाने गाईला ,बैलाला तर गोऱ्याला तर आता मानवावर हल्ला करायला लागल्याने परिसरातील शेतकरी ,शेतमजूर नागरिक भयभीत झाले आहे. परंतु वाघाची संख्या अधिक असल्याची चर्चा सर्वत्र गावकऱ्यात आहे . कोणी म्हणतात मोठी वाघीण व त्यासोबत दोन पिल्ले असल्याची बतावणी केल्या जात आहे. तर काही ठिकाणी वाघाच्या पंजाचे ठसे सुद्धा आढळून येत आहे तर वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वणी तालुक्यात वाघांना पकडण्यासाठी पिंजरे ,कॅमेरा लावल्याचे बोलल्या जात आहे. वाघाला बेशुद्ध करण्यासाठी बंदूकधारी जरी आणले असतील तरी रात्रीच्या गस्तीत जीव धोक्यात कोणी घालणार नाही असा प्रश्न नागरिकांत निर्माण झाला आहे. कोळसा खणीमुळे विविध ठिकाणी मातीचे ढिगारे तयार करून त्यावर मोठ्या प्रमाणात जंगल तयार झाल्याने व वणी परिसरात जंगल असल्याने वाघ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच स्थलांतर होताना दिसत आहे त्यामुळे सर्वत्र इथे दिसला तिथे दिसला अशी संपूर्ण वणी तालुक्यात चर्चा आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगल लगत असल्याने शेतीच्या कामासाठी दररोज जाणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्याला आपला जीव मुठीत घेऊन चालताना सतर्कतेने जावे लागत आहे. केव्हा वाघाचे दर्शन होईल हे काहीही सांगता येत नाही तेव्हा शासनाने अशा हिंसक जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे व मनुष्य हानी होणार नाही याची दखल शासनाने घेतली पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी, शेतमजूर व कामगार नागरिकांकडून केली जात आहे.