वणी तालुक्यात 19 ग्रामपंचायतीत रणधुमाळी *
मतदानासाठी 60 केंद्र *
26 हजार 548 मतदार मतदानाचा हक्क बजावणार *
सुरेंद्र इखारे वणी – ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व वणी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 18 डिसेंबर2022 ला होत आहे. या निवडणुकीत 26 हजार 548 मतदार 60 मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार निखिल धुळधर व नायब तहसिलदार कापशिकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबधीत ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी केली आहे. त्यामुळे वणी तालुक्यात 162 गावे असून यामध्ये 19 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत सर्वात मोठे मतदार संघ चिखलगाव असून यामध्ये प्रामुख्याने मतदार संख्या 5 हजार 925 अशी असून 18 ग्रामपंचायतीची मतदारसंख्या 20 हजार 623 आहे अशी एकूण 26 हजार 548 मतदार 18 ग्रामपंचायतीत मतदान करणार असून 152 सदस्य व 18 सरपंचाची थेट निवड होणार आहे.
या गावात रंगणार राजकीय फड – राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वणी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे त्यात अहेरी, बोर्डा, ब्राम्हणी, चारगाव, गणेशपूर, कायर, कुरई, मंदर, मेंढोली, रांगणा, साखरा (दरा), शिंदोला, वारगाव, वरझडी, वेळाबाई, पुरड (नेरड), केसुरली, चिखलगाव, कळमना, या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे यात शिंदोला ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेव्हा या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे काम निवडणूक अधिकारी तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार कापशिकर व इतर महसूल कर्मचारी पाहणार आहे.