सर्वसमावेशक भारतासाठी आरक्षण परिषदेचे आयोजन
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी – संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टिस सेक्युलरिझम अंॅंड डेमॉक्रॅसी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे द्वारा सर्वसमावेशक भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आरक्षण परिषदेचे आयोजन शनिवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर एसी सभागृह दीक्षाभूमी नागपूर येथे करण्यात आलेले आहे.
देशात आरक्षणाची सुरुवात सन 1910 मध्ये मुस्लिम आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांकांना आणि सन 1932 मध्ये अनुसूचित जातीसाठी राजकीय आरक्षणांनी झाली. ब्रिटिश सरकारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नाने सन 1944 मध्ये अनुसूचित जातींसाठी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण सुरू झाले. सन 1950 मध्ये राजकारण नोकरी आणि शिक्षणात आरक्षण अनुसूचित जाती व जमातींना देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी घटनेत तरतुदी केल्या. ज्या अंतर्गत इतर मागासवर्गीयांना आरक्षणाचा विस्तार करण्यात आला. आता हे आरक्षण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. काही काळापासून धार्मिक अल्पसंख्यांक महिला, दलित ख्रिश्चन आणि दलित मुस्लिम असे इतर गट गटआधारित आरक्षणाची मागणी करत आहेत. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वादविवाद सुरू आहेत. या संदर्भात फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फोर सोशल जस्टिस सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसीद्वारे अनेक गटांच्या आरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचे उद्घाटन सकाळी 10 ते 11:30 वाजता होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात तर प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनरवे उपस्थित राहतील.
सकाळी 11:30 ते 12:30 वाजता पहिले सत्र अनुसूचित जाती व जमाती या विषयावर आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी जमात इस्लामी हिंदचे अध्यक्ष डॉ.अन्वर सिद्धीकी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.अवत्ती रमय्या, डॉ संजय दाभाडे व दिनानाथ वाघमारे उपस्थित राहतील. दुपारी 12:30 ते 1 वाजता सत्र दुसरे धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न व त्यांचे आरक्षण या विषयावर आयोजित केले असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप खोडके तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड. फिरदोस मिर्झा व अरुण गाडे मार्गदर्शन करतील. दुपारी 1:30 ते 2:15 वाजता सत्र तिसरे दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चन आणि बौद्धांचे प्रश्न या विषयावर आयोजित करण्यात आले असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे जनरल सेक्रेटरी सच्चिदानंद दारुंडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे डॉ. सतीश देशपांडे मार्गदर्शन करतील. दुपारी 2:15 ते 3:15 वाजता सत्र चौथे महिलांच्या समस्या या विषयावर असून अध्यक्षस्थानी सखी महिला संघाच्या अध्यक्ष कल्पना मेश्राम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी खासदार सुभासिनी अली व विमल थोरात उपस्थित राहतील. दुपारी 3:15 ते 4:15 वाजता सत्र पाचवे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाच्या समस्या या विषयावर आयोजित करण्यात आले असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे अध्यक्ष सुभाष भड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मोहन गोपाळ व डॉ.दिशा वाडेकर मार्गदर्शन करतील. दुपारी 4:15 पंधरा ते 5:15 वाजता सत्र सहावे भेदभाव गटांसाठीचे धोरण या विषयावर आयोजित केले असून अध्यक्षस्थानी डॉ. विजय खरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अनुराग भास्कर व डॉ. अमित थोरात मार्गदर्शन करतील. सायंकाळी 5:15 ते 6 वाजता डॉ सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समारोपिय समारंभ आयोजित करण्यात आलेला असून यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये व विशेष अतिथी म्हणून राहुल परुळकर उपस्थित राहतील. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आयोजकांनी कळविले आहे.