कोव्हीड योध्याची पत्नी संध्या
परिवारासह उपोषणावर बसली
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी – महानगर पालिकेतील हंसा स्टारबस चे ड्रायव्हर मनीष सुखदेव खंडारे हे मनपाच्या कोव्हीड सेंटरला कार्यरत असताना 15 सप्टेंबर 20 ला त्यांचा कोव्हीड ने मृत्यू झाला. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विमा योजने अंतर्गत कोव्हीड-2019 नुसार कर्तव्य बजावताना मृत झालेल्या त्यांच्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत विनाविलंब मिळावी यासाठी कालपासून कोव्हीड योध्याची पत्नी संध्या मनीष खंडारे आपल्या परिवारासह यशवंत स्टेडियम येथे उपोषणावर बसली आहे.
*प्रकरणाची पार्श्वभूमी*
मृतक धम्मकीर्ती नगर दत्तवाडी, अमरावती रोड, येथील निवासी असून ते मनपाद्वारे चालविल्या जाणाऱ्या हंसा स्टारबस मध्ये 2017 पासून ड्रायव्हर होते. ते बर्डी-डिफेन्स या मार्गावर बस चालवायचे. कोव्हीड काळात मनपा द्वारे कोविड सेंटर मध्ये पेशंटची ने आण करणे, मृत व्यक्तीला घाटावर पोचवणे, याची जबाबदारी त्याच्यावर दिली होती. दरम्यान ते कोविड पेशंटच्या संपर्कात आल्याने त्यांना कोविड झाला व यातच 15 सप्टेंबर 20 ला त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा परिवार आर्थिक विपन्नावस्थेत आहे.
त्यांना शासकीय आर्थिक मदत व परिवारातील एकाला नोकरी मिळावी यासाठी त्यांची पत्नी संध्या ही मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा अधिकाऱ्यांना भेटली. अनेक निवेदने दिली. परंतु त्यांना काहीही मदत मिळाली नाही. सदर प्रकरण नगर विकास खात्याकडे पाठविण्यात आल्याचे तिला सांगुन वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहे.
मृताचे घरी कोणी कमावते नसून त्यांना रितीकेश व मितांश अशी दहावी व बारावीला शिकणारी दोन मुले आहेत. सोबतच मृतकाची कलाबाई नावाची म्हातारी आई आहे. त्यांच्या पालन पोषणासाठी संध्याला खाजगी काम करावे लागते. बहुजन समाज पार्टीचे नेते उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना भेटून सदर प्रकरणाची गंभीरता सांगण्यात आली. यापूर्वी संध्याने पत्रपरिषद घेऊन उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार ती कालपासून उपोषणावर बसली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री ह्यांना त्यांनी निवेदने दिली आहेत.