नामांतर शहिदांना अभिवादन
नागपूर ( जयंत साठे) – मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे या एकमेव मागणीसाठी जे शहीद झाले, त्या नामांतर शहिदांना आज नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने इंदोरा येथील दहा नंबर पुल परिसरात असलेल्या नामांतर शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी झालेल्या सभेत प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के यांनी याप्रसंगी नामांतराच्या नावाखाली ज्या प्रस्थापित जातीयवादी सरकारने आंबेडकरी समाजाला 17 वर्षे वेठीस धरले त्या सरकारला व त्याच्या पाठीराख्यांना येणाऱ्या निवडणुकीत बसपा त्यांची जागा दाखवून शहिद झालेल्याचा बदला घेईल असे मनोगत व्यक्त केले.
नामांतर आंदोलन हे देशात सर्वात जास्त चाललेले वैधानिक आंदोलन आहे. या आंदोलनाचे वैशिष्ट्य असे की महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 27 जुलै 1978 ला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याचा ठराव एकमताने पास करण्यात आला होता. परंतु सरकारच्या व विरोधकांच्या जातीयवादी भूमिकेमुळे हा प्रश्न सतरा वर्षे लोंबकळत राहिला. दरम्यान आंबेडकरी समाजाची जीव आणि वित्तहानी होत राहिली. शेवटी नामांतर ऐवजी एका विद्यापीठाची दोन विद्यापीठे करून मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला. या घटने पासून बसपा संस्थापक कांशीरामजी यांनी धडा घेऊन उत्तर प्रदेशात स्वतःची सरकार बनवून अनेक विद्यापीठे निर्माण केली. यापासून महाराष्ट्रातील आंबेडकरी व बसपा कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन नामांतर आंदोलनात सहभागी असलेले बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश गजभिये यांनी तर समारोप महेश सहारे यांनी केला.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी नगरसेवक संजय जयस्वाल, गौतम पाटील, इब्राहिम टेलर, वैशाली नारनवरे, विरंका भिवगडे, अभिलेष वाहाने, गौतम गेडाम, शंकर थुल, विनोद सहाकाटे, सुबोध साखरे, मॅक्स बोधी, राकेश जांभुळकर, अनिल साहू, राजकुमार बोरकर, सदानंद जामगडे, स्नेहल उके, ऍड सुरेश शिंदे, राजेश पाटील, वीरेंद्र कापसे, प्रा सुनील कोचे, विलास सोमकुवर, राहुल उके, नितीन वंजारी, अनिल मेश्राम, स्वप्निल ढवळे, गोपाल मेश्राम, मनोज गजभिये, मुकेश मेश्राम आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.