*लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय युवा दिन संपन्न* ….
सुरेंद्र इखारे वणी – लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये दि. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना , समाजशास्त्र विभाग आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित ऍडव्होकेट डी. एम . ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनात आचरण कसे करावे ,लोकशाही व्यवस्थेचे जे नियम आहेत त्या नियमांचे तंतोतंत पालन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे . या कर्त्यव्याचा विसर पडणे म्हणजे आपली अधोगती आहे. देशाला विकसित मार्गावर जर न्यायचे असेल तर या देशाच्या भविष्याला म्हणजेच तरुणाईला सक्षमपणे व कर्त्यव्याने काम करावे लागेल असे मत व्यक्त केले , त्यानंतर अधिवक्ता एस. जी. क्षीरसागर यांनी पोस्को कायद्याचं महत्व व गुन्हेगारी या विषयावर आपले मत व्यक्त करतांना तरुणांनी गुन्ह्यांपासून दूर राहणे काळाची गरज आहे, आपली जबाबदारी व कर्त्यव्य ओळखून त्याअनुषंगाने तरुणांचं वर्तन असायला हवे असे मत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी तरुणांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवायला हवा आणि स्वयंप्रेरणेने देश विकासात स्वतःचे योगदान द्यायला हवे असे प्रतिपादन केले. तसेच पुढे स्वाती कुटे वाहतूक शाखा कर्मचारी यांनी वाहतूक शाखेचे नियम व तरुणांची कर्त्यव्य या विषयावर विचार व्यक्त केले , तसेच श्री महेश राठोड वाहतूक शाखा कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. निलिमा दवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. युवक कसा असावा या विषयावर त्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास जुनगरी यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.