खेळामुळे मन, बुद्धी व शारिरीक विकास होतो – निखिल धुळधर
कार्तिक पटेल वणी:– विद्यार्थ्यांनाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा मुळ उद्देश आहे. त्यासाठी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा शारिरीक विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी वैयक्तिक व मैदानी खेळ आवश्यक आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांनाच्या मन, बुद्धी व शारिरीक विकास होतो. असे प्रतिपादन नगर पालिकेचे प्रशासक तथा तहसीलदार निखिल धुळधर यांनी केले. ते नगर परिषद वणी तर्फे स्वा. सावरकर न. प. शाळा क्र. 5 मध्ये आयोजीत आंतर शालेय क्रीडा व कला महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी नगर परिषद वणी चे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर, प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, नगर परिषदेचे लेखापाल पांडुरंग मांडवकर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक किशोर परसावार, वसंत आडे, गजानन कासावार शाळा व्यवसथापन समितीचे अध्यक्ष उज्वला घाटोळे, दीनानाथ आत्राम हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोरे यांनी केले. पंचांना शपथ गिरीधर चवरे यांनी दिली. त्याआधी अतिथीनी ध्वजारोहण करून क्रीडाज्योत पेटविली.
प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना स्नेहदीप काटकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी मैदानावर खेळ भावना जोपासून क्रीडा कौशल्य दाखवावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषण करतांना मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन अशा स्पर्धेतून राज्य व देश पातळीवरील खेळाडू निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी कबड्डीचा दर्शनीय सामना शाळा क्र. 7 विरुद्ध शाळा क्र. 1 मध्ये झाला. त्यात शाळा क्र. 7 चा विजय झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गितांजली कोंगरे यांनी केले. आभार प्रदर्शन रजनी पोयाम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी क्रीडा सचिव प्रेमदास डंभारे, मीना काशीकर, दर्शना राजगडे यांनी परिश्रम घेतले.