वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात साबण , काजळ निर्मिती ,प्रदर्शन व विक्री
सुरेंद्र इखारे वणी – येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयांच्या सभागृहात ४ मार्च २०२३ रोजी रसायनशास्त्र विभागाद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम स्वरूपात विद्यार्थ्यांनी तयार केलेला साबण आणि काजळाचे प्रदर्शन आयोजित केले . याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी या प्रदर्शनीचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या प्रदर्शनाचे सुंदर माध्यम असून वर्गात आत्मसात केलेले शिक्षण प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे असे विचार व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी हळद, चंदन, कडुलिंब आणि तुळशी या चार प्रकारच्या वनस्पती पासून २२५ साबण व १०० काजळ डब्यांची निर्मिती केली ज्यांची येथे विक्री करण्यात आली. त्यानंतरही असलेली मागणी उपक्रमाच्या यशस्वीतेची पावती आहे.
कार्यशाळेच्या संयोजिका रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनात राहुल ठेंगणे, डॉ. प्रशांत लिहितकर, कुणाल वनकर, श्वेता राऊत, अमित काळे, मोनाली कडासने, अश्विनी धुळे व सायली लडके या शिक्षकांसह राजू आगलावे, रामराव आडे, जयंत व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतले.