शिक्षकांच्या समस्या सोडविणे हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू – नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले
सुरेंद्र इखारे वणी: – येथील विवेकानंद विद्यालयात सत्कार समारंभ प्रसंगी नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की मी सर्वतोपरी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून. शिक्षकांच्या समस्या सोडविणे हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू आहे असे मत व्यक्त केले. येथील विवेकानंद विद्यालयात नागपूर विभाग मतदार संघाचे नवनियुक्त शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. शंकरराव व-हाटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद देशमुख, मंडळाच्या संचालिका तथा पर्यवेक्षिका वंदनाताई व-हाटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप आसकर, वि मा शि संघ विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे, वि मा शि संघाचे यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते व्ही. बी .टोंगे, विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता शेकार प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, विद्यालयाचे संस्थापक सचिव तथा माजी मुख्याध्यापक स्व. दे .मा. ठावरी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप आसकर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला”
नागपूर विभागाला खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या समस्याची जाण असणारा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या रूपाने मिळाला” असे प्रतिपादन प्रा. डॉ. शंकरराव व-हाटे यांनी अध्यक्षस्थाना वरून बोलताना केले. विवेकानंद विद्यालय वणी ,विवेकानंद प्राथमिक विद्यालय वणी यांचे वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन नवनियुक्त आमदार सुधाकर अडबाले सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या समस्यांचे निवेदन आमदारासमोर सादर केले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष किशोर बोढे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांच्या समस्यांचा पाडा सर्वांसमोर मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर मोरे तर आभार संतोष म्हसे यांनी मानले . यावेळी विवेकानंद विद्यालय, विवेकानंद प्राथमिक विद्यालय, विवेकानंद तांत्रिक विद्यालय व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, इतर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.