पालीभाषा तळागाळात पोहोचावी
-डॉ संजय दुधे
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी:- पाली भाषा ही भारताची प्राचीन भाषा आहे. या भाषेत भगवान बुद्धांनी आपला उपदेश दिला. तो उपदेश सम्राट अशोकाने संपूर्ण जगात पोहोचविला. ही भाषा मानवाला शील, सदाचार शिकविणारी आहे. पालीभाषा ही सर्वांनी तळागाळात पोहोचविली पाहिजे असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी व्यक्त केले. ते पाली प्राकृत आणि बौद्ध अध्ययन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये अध्यक्षस्थानी बोलत होते.
पुढे बोलतांना डॉ संजय दुधे यांनी विदेशातील बौद्ध अभ्यासकांना नागपूर विद्यापीठात पाली व बौद्ध अध्ययनाचे संशोधनात्मक उच्च शिक्षण घेता यावे यासाठी नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही मत व्यक्त केले. याप्रसंगी त्यांच्या हस्ते महाकश्यप महास्थवीर विपश्यना केंद्र व डॉ भदंत आनंद कौशल्यायन ज्ञानस्त्रोत केंद्र चे उद्घाटन करण्यात आले.
या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन पाली विभूषण डॉ भालचंद्र खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी यांनी, संचालन प्रा सरोज वाणी ह्यांनी तर आभार प्रा डॉ सुजित वनकर यांनी मानले . पाहुण्यांचे स्वागत डॉ. तुळसा डोंगरे, डॉ. ज्वाला डोहाने, डॉ. रोमा शिंगाडे, उत्तम शेवडे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. उद्घाटनानंतर पुण्यातील अभिमत विद्यापिठाच्या डेक्कन कॉलेजचे विभाग प्रमुख डॉ श्रीकांत गणवीर यांनी बौद्ध लेणी स्थापत्य यावर प्रामुख्याने मार्गदर्शन केले. श्रीकांत गणवीर हे आरकालॉजी विभागातील तज्ञ व अभ्यासक असून ते याच विषयावर डॉ. तलत प्रवीण, पाली व बुद्धिस्ट स्टडीज विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ह्या 16 पासून 18 मार्च पर्यंत मार्गदर्शन करतील.
समारोपीय सत्राचे अतिथी डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, रा तु म नागपूर विद्यापीठ, नागपूर हे राहतील.
कार्यशाळेला आजी-माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. नीरज बोधी ह्यांनी केले आहे.