प्रज्ञेचे प्रकाशमान कर्तृत्व निर्माण करण्यासाठी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना – डॉ. यशवंत मनोहर
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे – डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना ही प्रज्ञेचा प्रकाश व गगनभेदी कर्तृत्व निर्माण करण्यासाठी स्थापन केले होते. हा प्रज्ञेचा प्रकाश धारण करणाऱ्यांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे मनोहर जिलठे होय असे मनोगत यशवंत मनोहर यांनी प्रा.डाॅ. मनोहर जिलठे लिखित ‘द रिपल्स ऑफ निर्गुडा’ या इंग्रजी ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. नागपूर येथील सीताबर्डी अर्पण सभागृहातील कार्यक्रमाला ‘रिपल्स ऑफ निर्गुडा’ या इंग्रजी ग्रंथाचे लेखक मनोहर जिलठे,प्रा.डाॅ. रमेश शंभरकर, बबनराव जिल्हेकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले उपस्थित होते. डॉ.यशवंत मनोहर पूढे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जॉन ड्युईंची व्याख्याने कधीच टाळले नाही. बाबासाहेब म्हणतात की, कोलंबिया विद्यापीठात गेल्यावर मी स्वतंत्रपणे विचार व्यक्त करू शकतो, हे मला पहिल्यांदा जाणवले. तसा स्वतंत्रपणे विचार व्यक्त करणाऱ्या पिढ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती. या पुस्तकाचे लेखक हे कुरूपतेला व विद्रुपतेला भितात. लेखकाचे हे व्यक्तिमत्व मोठे लोभस आहे. ते व्यक्तिमत्व मिलिंद महाविद्यालयात घडले. या पुस्तकाचे लेखक मनोहर जिलठे यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या व आपल्या जीवनातील काही कटू अनुभव त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. रमेश शंभरकर म्हणाले की, या पुस्तकाला आत्मकथन म्हणता येईल काय? आंबेडकरवादी साहित्याने आत्मकथनाचे जे प्रमेय ठरविले होते त्यानुसार हे आत्मकथनात बसत नाही, परंतु या मधल्या बऱ्याचशा गोष्टी आत्मकथनाशी निगडित आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालिक जिल्हेकर, संचालन जयंत साठे तर आभार हृदय चक्रधर यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.