डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर नागरिकांसाठी सज्ज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी होणार लोकार्पण
जयंत साठे नागपूर जिल्हा प्रतिनिधी: नागपूरच्या वैभवात भर घालणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरचे काम पूर्ण झाले असून, ते नागरिकांसाठी सज्ज आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मा.ना.नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, परीवहन, महामार्ग विभाग, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा. ना.एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली तसेच मा.ना. देवेंद्रजी फडणवीस, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कामठी रोडवर नासुप्रच्या ७,५०० चौरस मीटर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे कन्व्हेंशन सेंटर साकारण्यात आले असून १४ एप्रिल रोजी त्याचे लोकार्पण होऊन ते नागरिकांसाठी खुले होणार आहे.
संसद भवनाची प्रतिकृती असलेले हे कन्व्हेंशन सेंटर नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारे आहे, २०० लोकांच्या क्षमतेची आंतरराष्ट्रीय दर्जाची ई-लायब्ररी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधन करणाऱ्या जगभरातील लोकांना येथे वाव असेल, कलावंतांसाठी एक आर्ट गॅलरी, रिसर्च सेंटर, एकाच वेळी १०० लोक प्रशिक्षण घेऊ शकतील, असे अत्याधुनिक ट्रेनिंग सेंटर, सातशे लोक बसू शकतील, असे अत्याधुनिक सभागृह, ४०० लोकांच्या क्षमतेचे बँक्वेट हॉल, किचन व पॅन्ट्रीसह, डायनिंग हॉल. बिझनेस सेंटर आणि रिसेप्शन, रेस्टॉरंट, फाउंडेशन ऑफिस, व्हिवर्स गॅलरी म्युझियम व आर्ट गॅलरी, व्हीआयपी गेस्ट रूम असे भव्य आणि वैशिष्टपुर्ण आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे व डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर हे करीत आहे.