डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारदृष्टी सर्वाधिक कालसुसंगत – डॉ. शैलेंद्र लेंडे
जयंत साठे नागपूर जिल्हा प्रतिनिधी:विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 जयंती दिन समारंभ उत्साहपूर्वक घेण्यात आला. हा जयंती समारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र धर्मदास लेंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी या नात्याने विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. संजय पळवेकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले हे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणामधून डॉ. शैलेंद्र धर्मदास लेंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकंदर कार्य कर्तृत्वावर प्रकाश झोत टाकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले विचारकार्य हे आधुनिक भारताची निर्मिती करणारे सिद्ध झाले. भारतातील लोकशाही ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधनावर पोसली गेलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट करून दाखवले. आजच्या कालखंडामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार भारताच्या अभ्युदयासाठी सर्वाधिक कालसुसंगत असल्याची मांडणी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधून केली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ संजय पळवेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या न्याय प्रश्नांसाठी कधीही मागे हटले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांसाठी कदापिही तडजोड केली नाही, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
डॉ. अविनाश फुलझेले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटातील अनेक ऐतिहासिक दाखले देत त्यांचे योगदान स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन समारंभाचे प्रास्ताविक डॉक्टर रमेश शंभरकर यांनी केले व सूत्रसंचालन डॉ. सरोज डांगे यांनी केले. आभार प्रा. प्रीती वानखेडे यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व एम ए भाग 1 आणि एम ए भाग 2 चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग यांनी मोलाचे परिश्रम घेतले.