वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची
उमेदवारांच्या डोअर टू डोअर भेटी
राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
सुरेंद्र इखारे वणी – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवरील वर्चस्वासाठी दोन पॅनल मध्ये चुरशीची लढत आहे. यापूर्वी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते परंतु आता वणी विधानसभेत राष्ट्रवादी पक्षच संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु या वर्षी वणीच्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, व उध्दव ठाकरे सेना गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकार व अल्प असलेला राष्ट्रवादी पक्ष अशी महाविकास आघाडी युतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात संचालक पदासाठी उभे ठाकले आहेत, तर वणी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिंदे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख विनोद मोहितकर, यांचे नेतृत्वात भाजप शिंदे शिवसेना गटाचे 18 उमेदवार संचालकपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे त्यामुळे ही निवडणूक एकास एक होत असल्याने राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चार मतदारसंघ आहेत त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. यामध्ये सहकारी सोसायट्या 68, ग्रामपंचायती 100 ,व्यापारी- अडते 125, हमाल- मापारी 89, असे एकूण एक हजार 855 मतदार आहे. एकएक मतासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता बळावली आहे त्यामुळे या निवडणुकीत आर्थिकतेची उलाढाल व जेवणावळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तेव्हा सर्वच उमेदवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे . कृषी उत्पन्नाची निवडणूक 18 संचालक पदासाठी होत आहे .यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व पदाधिकाऱ्यांनी डोअर टू डोअर भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होईल हे सध्यातरी सांगता येणार नाही.मात्र निवडणूक चुरशीची.