मानवी जीवनातील मूल्यांचे महत्व – विजय गंधेवार
नाट्यकर्मी अशोक सोनटक्के यांचे हस्ते डॉ दिलीप अलोने यांचा सत्कार
सुरेंद्र इखारे वणी – “भारताला विश्वगुरू पदावर स्थापित करायचे असेल तर ते आर्थिक किंवा इतर माध्यमातून होणार नाही. जग भारताकडे ज्या संस्कारांसाठी पाहते ते संस्कार, ती मूल्ये आपल्या स्वतःमध्ये आणि समाजात रुजवले तरच मानवी जीवनाचा आणि समाजाचा विकास संभव आहे. आपल्या अधिकारांसोबत आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली आणि त्यासाठी आवश्यक मानवी मूल्य जोपासली तरच आपण खऱ्या अर्थाने विश्वाचे मार्गदर्शक ठरू शकतो ” असे विचार श्री विजय गंधेवार यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात घेण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा माझं गाव माझा वक्ता या व्याख्यान शृंखलेत “मूल्य शिक्षण काळाची गरज !”या विषयावर ते व्यक्त होत होते.
यावेळी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी तथा शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे सहसचिव अशोक सोनटक्के उपस्थित होते.
मानवी जीवनात अत्यावश्यक असणाऱ्या विविध मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करीत श्री. विजय गंधेवार यांनी अत्यंत संयत पण अभ्यासपूर्ण आणि प्रभावशाली शैलीत मानवी जीवनातील मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
मूल्य शिक्षणाशी संबंधित तेरा गाभा घटकांचे त्यांनी केलेले विस्तृत विवेचन सर्व श्रोत्यांच्या पसंतीचा विषय ठरले.
विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे अध्यक्ष डॉ.दिलीप अलोणे यांना प्राप्त झालेल्या जादूभूषण पुरस्कारा निमित्त श्री अशोक सोनटक्के यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे आणि राम मेंगावर यांनी विशेष परिश्रम घेतले.