अवकाळी पावसाने थंड पाण्याच्या माठ व्यवसायावर गदा
व्यावसायिकांवर चिंतेचे सावट
सुरेंद्र इखारे वणी – यावर्षीच्या उन्हाळ्यात एप्रिलच्या 13 तारखेपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने थंड पाण्याच्या माठाच्या व्यवसायावर गदा आल्याने माठ व्यावसायिकांवर चिंतेचे सावट आहे . यावर्षीचा कडक उन्हाळा सुरू होताच मार्च व एप्रिच्या सुरुवाती पर्यंत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन या गरमी पासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात झाली होती. याचाच एक भाग म्हणजे फ्रिजमधील थंडगार पाणी पिण्याऐवजी अनेक जण साध्या माठातील पाणी पिणे पसंद करीत असल्याने माठाला चांगलीच मागणी होती. दोन वर्षांपूर्वी कोरोनासारखी महाभयंकर महामारी आल्याने व नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने व महामारीची भीती असल्याने सर्दी, खोकला, या आजारासमोर जाण्यापेक्षा फ्रिजचा वापर कमी झाल्याने माठ विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले होते. 40 ते 50 वर्षाच्या काळात कधी नव्हे यावर्षीच्या कडक अश्या एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्याच आठवडयात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे . या धुव्वाधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने या उन्हाळ्यात कोसळणाऱ्या पावसामुळे ऋतू बदलला की काय असा प्रश्न चर्चेला येऊ लागला आहे . उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मार्च ,एप्रिल व मे महिन्यात आग ओकणारा सूर्यदेव शांत होऊन आता मेघदूताला चाल दिली की काय असा प्रश्न चर्चिला जात असल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी पावसाने कुंभाराच्या व्यवसायावर अवकळा आली आहे.तसेच या डिजिटल युगात मठाला लागणारी साहित्य मिळणे कठीण झाले असताना हा व्यवसाय जातीचा व पूर्वीपासून चालत आलेला असल्याने कुंभाराने जिद्दीने हा व्यवसाय पूर्ववत करून सुरु केला आहे. हा पूर्वीपार व्यवसाय सुरू ठेवण्याकरिता बाहेरून मडकी आणून व्यवसाय सुरू केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मातीच्या माठामध्ये 10 टक्क्यांनी किंमतीत वाढ झाली असे वणी येथील तहसीलदार निवासासमोर माठाचा व्यवसाय थाटून बसलेल्या रुकमबाई गोणारकर वय 65 वर्ष यांनी सांगितले . मोठे रांजण 700 रुपये, मध्यम आकाराचे माठ 300 ते 400 रुपये, लहान माठ 200 ते 300 रुपये, बैलजोडी , गाय, येरणी, 50 रुपये विकले जात आहे. तसेच अनेक जण मातीच्या माठाना पसंती देत आहे. परंतु या अवकाळी पावसाने या व्यवसायावर गदा आणली असल्याचे बोरिअरब येथून व्यवसायासाठी आलेल्या रुकमबाईने सांगितले.