वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विद्यमान आमदार निवडणार
सभापती पदी कोणाची वर्णी लागणार; बैठकीनंतरच कळणार
सुरेंद्र इखारे वणी – नुकत्याच पार पडलेल्या वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 14 संचालक विजयी झाले आहे. चुरशीची समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत भाजपा व शिंदे सेना गटाच्या शेतकरी एकता पॅनलचे नेतृत्व विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले त्यांच्या या नेतृत्वात विरोधकांचा धुव्वा उडवून एकतर्फी विजय मिळवला .परंतु आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीत चुरस दिसून येत असल्याचे बाजार समितीच्या सदस्यात चर्चा आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. यापूर्वी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते परंतु या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप, शिंदे सेना गट उभे ठाकले होते. ही निवडणूक एकासेक असल्याने या निवडणूकित राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती . मात्र चुरशीची समजली जाणारी निवडणूक एकतर्फी झाल्याने विरोधकांचा दारुण पराभव झाला.व भारतीय जनता पक्षाने वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला झेंडा फडकवला . आता मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत निवडून आलेले संचालक ऍड विनायक एकरे, नितीन पानघाटे, प्रभाकर बोढे, दिलीप बोढाले , मंगल बलकी, मोहन वरराकर , अशोक पिदूरकर, वेनुदास काळे, मीरा पोतराजे, वैशाली राजूरकर, विजय गारघाटे, प्रकाश बोबडे, चंद्रकांत हिकरे, हेमंत गौरकार हे अनुभवी व राजकीय पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने प्रत्येकजण सभापती पदाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु भारतीय जनता पक्षाची बैठक न झाल्याने सध्यातरी सभापती पदाच्या नावाची चर्चा नाही असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे. सभापती पदाची निवड करताना भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे विजयी झालेल्या संचालकांची बैठक 22 किंवा 23 तारखेला होण्याची शक्यता बळावली आहे त्या बैठकीत सभापतीची निवड करण्यात येईल असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे.