स्वाधार योजनेसाठी नागपूर विभागासाठी 16 कोटी 27 लक्ष 50 हजार रूपयांचा निधी
विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार!
जयंत साठे नागपूर : नागपूर विभागातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने व आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर समाज कल्याण विभागास 16 कोटी 27 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सदर प्राप्त झालेला 16 कोटी 27 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत.
नागपूर विभागात समाज कल्याण विभागामार्फत एकूण 70 शासकीय वसतिगृह कार्यरत असुन त्यामध्ये 7 ते 8 हजार विद्यार्थींची शिक्षणाची सोय झाली आहे, ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. दरवर्षी सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. नागपूर विभागीय, जिल्हा व तालुका याप्रमाणे विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते. यापूर्वी शासनाने नुकतेच सदर योजनेसाठी रुपये १ कोटी 27 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता, आता रुपये 15 कोटींचा निधी ऑनलाईन प्रणालीवर प्रादेशिक कार्यालयास उपलब्ध झाला आहे.
समाज कल्याण विभागाने “सामाजिक न्याय पर्व”तसेच “योजनांची जत्रा” या शासनाच्या विशेष अभियानांतर्गत डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर व सबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी स्वाधार योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणावर तपासुन मंजूर केले असून प्राप्त झालेल्या निधीमुळे आता मंजूर अर्ज निकाली निघणार आहेत. आता रुपये 16 कोटी 27 लक्ष, 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाने मार्गी लावला आहे.
” समाज कल्याण विभागाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महत्त्वपूर्ण व यशस्वी योजना आहे, विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून पाठपुरावा करून निधी प्राप्त करून घेण्यात आला आहे. तसेच योजनेमध्ये लवकरच सुधारणा करण्यात येणार आहेत त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात योजना राबविताना अधिक सुलभता व पारदर्शकता निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे आयुक्त ,समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.