आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. सुरज ऐंगडे यांची कांशीराम रिसर्च सेंटर ला सदिच्छा भेट
नागपूर जयंत साठे:
अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठात पीएचडी करीत असलेले तसेच युरोप व आफ्रिकेत शिक्षण घेतलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आंबेडकरी युवकांचे आयकॉन डॉ सुरज मिलिंद ऐंगडे यांनी नागपुरातील कांशीराम रिसर्च सेंटर व मान्यवर कांशीराम सार्वजनिक वाचनालयाला आज सदिच्छा भेट दिली.
या सेंटरचे संचालक बसपा चे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे हे असून यांच्याकडे कांशीरामजींच्या चळवळीचे 1971 पासूनचे संपूर्ण मूळ साहित्य उपलब्ध आहे. डॉ सुरज मिलिंद ऐंगडे हे मूळ नांदेडचे असून यांचे वडील बामसेफ चळवळीतील कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर कांशीरामजींच्या नेतृत्वाचा प्रभाव आहे. हल्ली डॉ सुरज बाबासाहेबांच्या जाती निर्मूलन या विषयावर जागतिक पातळीवर कार्य व संशोधन करीत आहेत.
उत्तम शेवडे हे 1980 पासून आजपर्यंत कांशीरामजींच्या चळवळीत सक्रियरित्या कार्यरत आहेत. शेवडे यांनी 2010 साली कांशीरामजीवर एक इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केला असून सध्या ते नागपूर विद्यापीठात कांशीरामजींच्या महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीवर पीएच डी करीत आहेत. यांच्याकडे कांशीरामजींचे दुर्मिळ साहित्य संकलित असून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित व्हावे यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. बाबासाहेबांची चळवळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी कांशीरामजींनी जे प्रयत्न केले ती मुव्हमेंट साहित्याच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचावी हा उत्तम शेवडे यांचा उद्देश आहे.याच विषयावर उत्तम शेवडे यांची डॉ सुरज ऐंगडे सोबत दीर्घ चर्चा झाली. याप्रसंगी आवाज इंडिया टीव्ही चे संचालक प्रियदर्शी (प्रीतम) बुलकुंडे, त्यांचे सहकारी डॉ राजेंद्र फुले, प्रफुल भालेराव इंजि विद्यार्थी शेवडे प्रामुख्याने उपस्थित होते.