कोळशाच्या अनियंत्रित वाहतुकीमुळे साखरा (कोलगाव)ते शिंदोला रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहतूक बंद करण्याची मागणी
पोलीस व आरटीओ विभागाचे दुर्लक्ष
नागरिकांत असंतोष ; न्याय मागणीसाठी आंदोलनाचा इशारा
सुरेंद्र इखारे वणी :- वणी तालुक्यातील डब्ल्यूसिएल च्या मुंगोली, पैनगंगा, कोलगाव, या खाणीतील कोळश्याची अनियंत्रित वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक असल्याने साखरा ते शिंदोला रस्त्याची वाट लागून जागोजागी पसरट खोल खड्डे पडल्याने व रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने कोळश्याची अनियंत्रित वाहतुक बंद करण्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर व समस्त गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले याना देण्यात आले आहे. वणी तालुक्यातील साखरा ,शिंदोला या प्रमुख जिल्हामार्गावर भारक्षमता 20 टन व 7 मीटर अरुंद रस्त्याने घुगूस ,वणी रेल्वे सायडिंग व अन्य ठिकाणी दिवसरात्र 18चाकी,12 चाकी ,व 14,चाकी वाहनांची भारक्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक होत असल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे या रस्त्यावरून कोळश्याची वाहतूक करताना कुठल्याही प्रकारची ताडपत्री नसल्याने प्रदूषणात वाढ होऊन कोळशाचे कण डोळ्यात जाऊन टू चाकी वाहनाचा अपघात होऊन जीव जात आहे.तसेच कोळश्याची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक ला नंबर प्लेट नाही .परराज्यातील वाहन चालक तसेच क्लिनर सुद्धा सुसाट वेगाने कोळश्याची वाहतूक करत असल्याने साखरा, कोलगाव, मुंगोली, माथोली, जुगाद, शिवणी, टाकळी, येनक, येणाडी, शेवाळा ,शिंदोला येथील नागरिकांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून चालावे लागत आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर लाखो रुपये खर्चूनही खड्डे बुजले नाही याकडे सार्वजनिक बांधकाम व डब्ल्यूसीएल सुद्धा दुर्लक्ष करीत आहे तसेच पोलीस प्रशासन व आरटीओ विभाग सुद्धा मूग गिळून गप्प बसले आहे. शिंदोला येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने आरोग्याच्या दृष्टीने 35 गावातील नागरिकांचा संबध येतो तसेच मोठी बाजारपेठ आहे, शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून ये जा करणे कठीण झाले आहे तसेच नियमबाह्य व अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. तेव्हा शासनाने कोळशाच्या अनियंत्रित वाहतुकीवर आळा घालून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व डब्ल्यूसीएल ने तात्काळ लक्ष घालून शिंदोला ते साखरा वाहतुकीसाठी योग्य करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा नागरिकांमध्ये असंतोष धुमसत असून त्वरित कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने कोळसा वाहतूक बंद करून न्याय मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संबधीत निवेदनाच्या प्रति आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रादेशिक अधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम वणी, क्षेत्रीय महाप्रबंधक वणी एरिया ताडाळी, उपक्षेत्र प्रबंधक वणी एरिया, पोलीस निरीक्षक वणी, तसेच सरपंच साखरा याना देण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर व समस्त गावकरी उपस्थित होते.