लोकमान्य टिळक महाविद्यालयात दीक्षारंभ उपक्रमाचे आयोजन.
सुरेन्द्र इखारे वणी :- महाविद्यालयात पदवी स्तरावर प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपलब्ध विविध सुविधांचा परिचय व्हावा तथा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुयोग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी विद्यापीठाद्वारे प्राप्त मार्गदर्शक तत्त्वानुसार वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात दीक्षारंभ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित प्रथम सत्रात वणी येथील उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांनी स्पर्धा परीक्षा आणि रोजगार या विषयावर मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांचे विविध प्रकार, त्यांची परीक्षा पद्धती तथा त्यासाठी अभ्यास करण्याच्या पद्धतींवर सविस्तर प्रकाश टाकला. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या पदांची विविध वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती सांगून मतदान नोंदणीसाठी आवाहन देखील केले.
दुसऱ्या सत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ. अभिजित अणे यांनी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास विभागाच्याद्वारे उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधा तथा त्यातून प्राप्त होणाऱ्या संधींचा व्यापक परिचय करून देत महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या विविध कौशल्यवर्धक अभ्यासक्रमांची देखील माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षारंभ कार्यक्रमाचे संयोजक तथा नॅक समन्वयक डॉ. करमसिंग राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे यांनी केले.
चार दिवस चालणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना विविध मान्यवर वक्त्यांच्या मार्गदर्शनासह महाविद्यालयात उपलब्ध विविध सुविधांचा परिचय करून देण्यात येणार आहे.