पाली ही जगातील समृद्ध भाषा : डॉ निशांत लोहागुण
नागपूर जयंत साठे :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत व बौद्ध अध्ययन विभागात विभाग प्रमुख डॉ नीरज बोधी यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाला डॉ. निशांत लोहागुण कलकत्ता, ऍड शैलेश नारनवरे, डॉ. तुळसा डोंगरे, डॉ. रेखा बडोले, डॉ. सुजित वनकर व प्रा. सरोज वाणी ह्यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करतांना डॉ. लोहागुन म्हणाले की “पाली भाषेचा अन्य भारतीय भाषेशी तुलनात्मक अध्ययन केले असता पाली भाषेचे तत्व अन्य सर्व भारतीय भाषेमध्ये दिसून येतात. कुठल्याही संस्कारीत भाषेपेक्षा बोली ही भाषेशी अधिक जवळीक साधनारी असते. पाली ही बोली भाषा आहे, त्यामुळे तिचा संबंध अन्य भारतीय भाषेशी अधिक जवळचा आहे. पाली ही भाषा जगातील सर्वात समृद्ध भाषेपैकी एक भाषा आहे. बुद्धत्वाचा अनुभव धारण करण्याची व त्याचे पालन व रक्षण करण्याची क्षमताही पाली भाषेमध्ये दिसून येते.”
केंद्र व राज्य सरकारच्या जनगणना विभागातील डॉ लोहागुन आणि रुचिता तेलंग हे पाली ही मातृभाषा आहे? याबद्दलचा शासकीय सर्वे करण्यासाठी नागपूरला आले होते. या प्रसंगी त्यांनी पाली भाषेच्या अभ्यासाकापुढे आपले विचार व्यक्त केले. प्रसिद्ध कायदेतज्ञ डॉ. शैलेश नारनवरे यांनी पाली भाषेसाठी चाललेल्या न्यायिक संघर्षाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी म्हटले की “पाली भाषेचा समृद्ध वारसा असून सुद्धा पाली भाषेशी सावत्र वागणूक हेतूपुरस्सर केली जात आहे.” पाली भाषेला आठव्या परिशिष्टामध्ये स्थान मिळाले पाहिजे व पाली विद्यापीठ झाले पाहिजे यासाठी आपण कशाप्रकारे कायदेशीर संघर्ष केला पाहिजे याची तपशीलवार माहिती ऍड. शैलेश नारनवरे यांनी याप्रसंगी दिली.
परिसंवादात डॉ. रेखा बडोले, डॉ. सुजित वनकर आणि प्रा. सरोज वाणी यांनी पालीभाषेतुन आपले वक्तव्य मांडले. डॉ रेखा बडोले यांनी पाली भाषेची महती प्रकट केली. प्रा. सरोज वाणी यांनी पाली भाषा एक समृद्ध भाषा आहे असे मत मांडले तर डॉ. सुजित वनकर यांनी ‘पाली भाषेचा इतिहास आणि उपयोगिता’ या विषयावर संवाद साधला.
विभाग प्रमुख डॉ. निरज बोधी यांनी आपले अध्यक्षीय संबोधन करताना म्हटले की “पाली भाषेकरिता नागपूर ही समृद्ध भूमी आहे. पाली भाषेला समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे.”
परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. कल्पना मून यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. बीना नगराळे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत डॉ ज्वाला डोहाने, प्रा ममता सुखदेवे, प्रा पुष्पा ढाबरे, ऍड विजय धांडे, उत्तम शेवडे, सचिन देव ह्यांनी केले. परिसंवादाची सांगता धम्मपालन गाथेनी झाली. परिसंवादाला विभागातील सर्व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.