डॉ आंबेडकर भवनासाठी संघर्षरत रणरागिनींचा सत्कार
जयंत साठे नागपूर -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त करणाऱ्यांच्या विरोधात अविरत लढा देणाऱ्या झुंजार भीम सैनिक आई- भगिनींचा आज एसीजेपीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांना पंचशील दुपट्टा, भारतीय संविधान, शाल आणि बौद्धाचार्य देविदास राऊत यांचे पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ त्रिशीला ढेंबरे तर प्रमुख अतिथी म्हणून बीजी गजभिये केजे चव्हाण देवेंद्र घरडे श्याम चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी खालील महिलांचा सत्कार करण्यात आला त्यात पंचफुला शेंडे विजया नंदेश्वर, जयवंतबाई मेश्राम, चंद्रभागा तभाने, अंजनाबाई कांबळे, सुमन वानखेडे, गौतमी पाटील, सावित्रीबाई सोमकुवर, कांताबाई झोडपे, छाया बोरकर, नलिनी नाईक, राधिका रामटेके, वंदना आटे, बबीता डोंगरवार, सरिता झोडापे, गीता नितनवरे, रंजना कावळे यांचा सहभाग होता.
याप्रसंगी लढा देणाऱ्या आमच्या आया बहिणींनी मनोगत व्यक्त करून सांगितले की, डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आमचा उद्धार झाला. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेले सांस्कृतिक भवन पाडणाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही अविरत संघर्ष करण्यास तयार आहोत. यामध्ये आमचा जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत ही जागा समाजाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या शासनाच्या विरोधात झुंज देऊ असे मनोगत या रणरागिनींनी व्यक्त केले. मंचावर सर्व उपस्थित त्यांनी या आईचं कौतुक करत त्यांना नतमस्तक होत सलाम केला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉक्टर त्रिशीला ढेमरे म्हणाल्या की,शासनाने अंबाझरी उद्यानाची ४४ एकर जमीन बेकायदेशीर रित्या मनपाकडून परत घेतली आहे. ती नियमांचे पालन न करताच मे. गरुडा अम्युझमेंट पार्क लिमिटेड ला ९९ वर्षाच्या भाडेपट्ट्यावर नाममात्र दरावर दिली आहे. हा सर्व व्यवहार संशयास्पद आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर महानगरपालिकेने सन १९५६ रोजी सन्मानपत्र देऊन सत्कार केला होता. त्याच वर्षी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले. त्यांच्या स्मरणार्थ महापालिकेने अंबाझरी उद्याना जवळील वीस एकर परिसरात डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारले होते. महापालिकेने या वास्तूची नीट देखभाल दुरुस्ती न केल्याने ती मोडकळीस आली.समाजाच्या मागणीनंतर नागपूर महानगरपालिकेने भवनाच्या दुरुस्तीसाठी रक्कमही मंजूर केली. परंतु करोणा काळच्या दोन वर्षात भवनाचा परिसर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाला हस्तांतरित करण्यात आला. नवीन कागदपत्रात आंबेडकर भवनाच्या परिसराचे अस्तित्व संपविण्यात आले. राज्य सरकारने अंबाझरी पार्क चा विस्तारित भाग म्हणून ४४ एकर जागा खाजगी विकासकांना दिली. त्याबद्दल आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड वंदना सहारे, संचालन मधुकर गजभिये तर आभार नंदा भगत यांनी मानले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.