शतकांनंतरही लोकमान्यांचे विचार अनुसरनिय – डॉ. जनार्दन काटकर
सुरेन्द्र इखारे वणी :- सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात होत असलेली मूल्यांची घसरण पाहता आदर्श म्हणून आपल्याला भूतकाळाकडेच पाहावे लागते हे खरोखरच क्लेशदायक आहे. मात्र या परिस्थितीत पुण्यतिथी नंतर १०३ वर्षांनी देखील लोकमान्य यांचे विचार आपणास चिंतनीय आणि अनुसरणीय वाटतात हेच लोकमान्य यांचे फार मोठे वैभव आहे. असे विचार विदर्भ महाविद्यालय अमरावतीचे मराठी विभाग प्रमुख डॉ .जनार्दन काटकर यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी व्याख्यान समयी कवितांमधील लोकमान्य टिळक या विषयावर ते व्यक्त होत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रमेश बोहरा यांच्यासह सहसचिव अशोक सोनटक्के तथा प्राचार्य डॉ .प्रसाद खानझोडे उपस्थित होते.
प्रास्ताविकासह वक्त्यांचा परिचय करून देताना डॉ प्रसाद खानझोडे यांनी आजपर्यंत टिळकांच्या विविध पैलूंना सादर केले गेले पण कवितांमधील टिळक हा नवीनच विषय असल्याचे विशेषत्वाने अधोरेखित केले.
आपल्या निरूपणात डॉ. काटकर यांनी आरंभी लोकमान्यांच्या विविध गुणांना आणि कार्यांना स्पष्ट केल्यानंतर स्वतःच्या राष्ट्रभक्त टिळक या कवितेने आरंभ करीत गोवर्धन वाघ यांच्या तीन कविता, सुधीर मोघे संदीप खरे यांच्या लोकमान्य कवितांसह अशोक नायगावकर यांची विडंबनात्मक कविता सादर केली त्याचप्रमाणे रामदास फुटाणे आणि कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये आलेले टिळकांचे उल्लेख देखील व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये रमेश बोहरा लोकमान्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालक डॉ अभिजित अणे यांनी नाना पाटेकर यांनी टिळकावर लिहिलेली कविता सादर करून टाळ्या घेतल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के यांनी केले.
कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य, मंडळाच्या सर्व संलग्न संस्थान मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह गावातील गणमान्य नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकर उरकुंडे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील समस्त शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विशेष प्रयत्न केले.