● ९ आगस्ट क्रांतिदिनी पाटणबोरी येथे जनआक्रोश मेळावा व रॅली
● मेळावा व रॅलीत माकप, किसान सभा व आदिवासी अधिकारमंच चा सहभाग
______________________
सुरेंद्र इखारे वणी :- पाटणबोरी संपूर्ण देशात आज आदिवासी व मूलनिवासीयांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून अश्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. संविधानाने मूलभूत अधिकार म्हणून जंगले, जमीन,पर्वत, पहाड व त्यावर असलेली संपदा ही आदिवासींच्या ताब्यात दिलेली आहेत. परंतु आलेल्या सरकार कडून हा अधिकार काढून आदिवासीयांच्या अखत्यारीत असलेली ही संपदा भांडवलदारांना देने सुरू केले आहे. भांडवलदारांना अडथळा आदिवासी आहेत म्हणून त्यांना त्यांच्या जमिनीवरून हुसकावून लावण्याचे महापाप भांडवलदारांच्या सरकार कडून केल्या जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आदिवासींचा छळ केला जातो आहे. मणिपूर मधील कुकी आदिवासी जमाती सोबत होणारा छळ हा त्याचाच एक भाग आहे, हे सर्व जगाला कळलं आहे. करिता या देशातील मूळ रहिवासी म्हणून आदिवासीयांचे अधिकार अबाधित राहिले पाहिजे. यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व आदीवासी अधिकार मंच सातत्याने संघर्ष करीत आहे. ह्याचाच एक भाग म्हणून ९ आगस्ट ह्या आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आणि स्वातंत्र्य चळवळीतील क्रांती दिन निमित्य केलापूर तालुक्यातील पाटणबोरी ह्या ठिकाणी जनआक्रोश मेळावा व रॅली होत आहे.
हा मेळावा कॉ. चंद्रशेखर सिडाम यांचे अध्यक्षतेखाली होत असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. ऍड. दिलीप परचाके, कॉ. अनिताताई खुनकर व कॉ. मनोज काळे हे राहणार आहेत.
या मेळाव्यात अर्ली चे माजी सरपंच शंकर कुमरे, घुबडी चे सरपंच हनुमंत कोवे, माजी ग्रापं सदस्य अय्या आत्राम व पत्रकार संदीप सुरपाम ह्यांचा जनसन्मान सत्कार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे येथील उत्तुंग जागृत व्यक्तिमत्त्व दिवंगत कॉ. गोविंदराव सिडाम यांच्या मरनोपरांत जाहीर सन्मान व्यक्त केले जाणार आहे. करिता ह्या जनआक्रोश रॅली व मेळाव्याला जास्तीतजास्त जनतेनी उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.