*नगर परिषद, वणी च्या वतीने “माझी माती,माझा देश” अभियान संपन्न*
सुरेन्द्र इखारे वणी :- आयुक्त तथा संचालक,नगर पालिका प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्या आदेशान्वये, नगर परिषद वणी चे प्रशासक निखिल धुळधर आणि मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनात, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के तसेच दी. अं. योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, न. प. वणी च्या विभाग प्रमुख ऍडव्होकेट पौर्णिमा शिरभाते यांनी “माझी माती, माझा देश” या अभियानाचे आयोजन केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष सांगता निमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांना वंदन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह वणी नगर परिषदेच्या वतीने ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात आले आहे.आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी या साठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची घोषणा केली होती. या अभियाना अंतर्गत पालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुख्यत्वाने पंचप्रण शपथ, शिलाफलक उभारणे,अमृत वाटिका, 75 देशी रोपांची लागवड, देशभक्ती गीत गायन कार्यक्रम,मिट्टी का कलश,वसुधा वंदन इत्यादी कार्यक्रम अतिशय हर्ष उल्लासात पार पडले. दि.14 ऑगष्ट रोजी स्थानिक कल्याण मंडप येथे सकाळी 8:30 वाजल्यापासून विविध कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. सुरवातीला स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती गीत गायन कार्यक्रम पार पडला. अतिशय सुरेल आवाजात, देशाभिमानानं श्रोत्यांच्या माना उचवाव्या अशा पद्धतीने या कार्यक्रमात गायकांनी आपले गीते सादर केली. गीत गायन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंदारे सर यांनी केले. त्यानंतर या अभियानांतर्गत ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन‘ या संकल्पनेनुसार शहरातील माजी सैनिकांचा आणि देशासाठी अमर हुतात्मा झालेल्या शहीद वीर जवणाच्या कौटुंबियांचा मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पागुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी शंकर तिरानकर, शे. महेबूब शे. रसूल, सुरेश अग्रवाल, शे. रफिक शे. उजैन, बंडू वाढई, भटगरे इत्यादी जवनांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर 75 मातीचे दिवे प्रज्वलीत करून “माती का कलश” तयार करण्यात आला, हा कलश भरणासाठी वणी शहराच्या विविध अशा 22 प्रभागातून माती आणण्यात आली होती. 75 मातीच्या दिव्यांनी या कलशाचे पूजन करण्यात आले आणि या कलशाला वंदन करण्यात आले. याच प्रसंगी “पंचप्रण शपथ” देण्यात आली.भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करण्याची, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करून भारताची एकात्मता बलशाली करण्यासाठी आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रति सन्मान बाळगून देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करण्याचे *’प्रण’* याची शपथ यावेळी न. प. चे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी उपस्थितांना दिली. राष्ट्रागीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम हापसे यांनी केले तर आभार प्रदर्शन लेखाधिकारी पांडुरंग मांडवकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंत सोनटक्के, पौर्णिमा शिरभाते, विनोद मनवर, भोलेश्वर ताराचंद,क्रांतिज्योती शहर स्तर संघांच्या पदाधिकारी, समूह साधन व्यक्ती आणि न. प. वणी चे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. यावेळी दी. अं. यो – राष्ट्रीय नगरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित महिला बचत गटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
याच अभियानाचा एक भाग म्हणून वणी नगर परिषदेच्या प्रांगणात एक भव्य असा *शिलाफलक* उभारण्यात आला आहे. या शिलाफलकावर वणी शहरातील शहीद आणि वीरांचा नामोल्लेख केलेला शिलालेख कोरण्यात आलेला आहे.आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या वीरांप्रती आपल्या मनात असलेली अत्यंत आदराची व अभिमानाची भावना व्यक्त करण्यासाठी सदर शिलाफलक उभारण्यात आला आहे. “मातृभूमीसाठी प्रत्येक दिवस, काळाचा प्रत्येक क्षण,आणि जीवनाचा प्रत्येक क्षण,जगणे हीच स्वातंत्र्य सैनिकांना आपली खरी आदरांजली असेल” हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश असलेल्या शिलाफलकाचे अनावरण न. प. प्रशासक निखिल धुळधर आणि मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केले. या प्रसंगी पालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी,शहरातील जेष्ठ नागरिक, प्रतिष्टीत नागरिक, विविध युवक मंडळाचे पदाधिकारी,सेवाभावी संस्था चे पदाधिकारी, शहरातील शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका आणि महिला बचत गटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.