शेत – शिवारात सापांचा वावर वाढला
शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे सर्पमित्र संतोष सोनी यांचे आवाहन
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी : मागील तीन -चार दिवसांपासून पावसाचा धडाका सुरू आहे. सततच्या पावसामुळे सापांच्या अधिवासात पाणी शिरत असल्याने आणि त्यांना खाद्य मिळणे कठीण असल्याने, शेत-शिवारात व पिकांत सापाचा संचार वाढत आहे. यंदाही अनेक शेतात साप आढळत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन विदर्भ सर्पमित्र समितीचे संतोष सोनी यांनी केले आहे.
पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. साप साप सोयाबीनच्या व दाटी असलेल्या पिकांत अंडी उबवतात. आॅगस्ट – सप्टेंबर दरम्यान त्याची पिल्ले होतात.त्याचबरोबर सापाच्या बिळात पाणी शिरते. त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी, लपण्यासाठी व सुरक्षित जागेच्या शोधात साप जून, ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्ती, शेती व पिकात वावरत आहेत.सद्यस्थितीत पिके चांगली वाढली आहेत. त्यामुळे त्यांना लपण्यासाठी व भक्ष्य शोधण्यासाठी सुरक्षित ठिकाण मिळत आहे. सोयाबीनच्या पिकात अजगर आढळून येतो. त्यामुळे
शेतकरयांनी पिकांत फवारणी करण्यासह निंदण, खुरपणाची कामे करीत असून, सापांमुळे असलेला धोका लक्षात घेत, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
शेतात फिरताना वा फवारणी करताना लांब जाड बुटांचा वापर करावा. शक्यतो यंत्राद्वारेच फवारणी करावी .पिकांत फिरताना जाठ काठी, बूट आदळत जावे, हाताने पिकांची पाहणी करू नये, पिकांत खाली वाकू नये, साप दिसल्यास त्याला न डिवचता सर्पमित्राला कळवावे. जून ते ऑगस्टच्या महिन्यात सर्वाधिक सतर्कता बाळगावी.
सततच्या पावसामुळे बिळात पाणी शिरल्याने सापांचा जमिनीवर, शिवारात संचार वाढतो. प्रामुख्याने उंच वाढलेल्या पिकांत खाद्य शोधण्यासाठी साप फिरतात. सापाला ऐकू येत नाही. जमिनीच्या कंपनावरून तो अंदाज लावतो. त्यामुळे पाय आदळत फिरल्यास सापाला कोणीतरी असल्याचे कळू शकते.त्यामुळे तो पळून जातो.शेतकऱ्यांनी सहसा लांब बुट घालूनच फवारणी किंवा पाहणी करावी असे आवाहनही संतोष सोनी यांनी केले आहे.