वणीच्या एसडीओ कार्यालयासमोर दादाजी पोटे यांचे अर्धनग्न आंदोलन
आंदोलन मागे घेण्यासाठी आंदोलनकर्त्याची फसवणूक
लोकशाही मार्गानेच आंदोलन करू
सुरेंद्र इखारे वणी – वणी हैद्राबाद मार्गावरील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पार वाट लागून दुरावस्था झाल्याने त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपविभागीय कार्यालयासमोर आज 4 सप्टेंबर2023 रोजी भर पावसात विजेच्या कडकडाटात पावसात भिजून थरथरत अर्धनग्न आंदोलन केले.
यापूर्वी 21जून 2023 रोजी याच रस्त्यासाठी लोटांगण आंदोलन केले. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे पुन्हा 17 ऑगस्ट 2023 रोजी उपविभागीय अधिकारी वणी यांच्याशी पत्रव्यवहार केला परंतु पत्रव्यवहाराची सुद्धा दखल घेतली नाही त्यामुळे नाईलाजास्तव 4 सप्टेंबर 2023 रोजी दादाजी लटारी पोटे वय 63 वर्ष रंगनाथ नगर वॉर्ड क्रमांक 22 यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील रहदारीच्या दुरावस्था झालेल्या रस्त्यावर अर्धनग्न आंदोलन केले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 2021 पासून लोकशाहिमार्गाने विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. या तहसील कार्यालय परिसरात शासनाचे अनेक विभाग आहेत यामध्ये प्रामुख्याने न्यायालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पोलीस वसाहत, पुढे याच मार्गावर सिंधी कॉलनी, व शहरातील नागरिकांच्या जाण्यायेण्याचा व रहदारीचा मार्ग आहे त्यामुळे बऱ्याच वर्षापासून या रहदारीच्या रस्त्यावर खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे टोंगळटोंगळ पाणी साचून नागरिकांचा अपघात होऊन जखमी होत आहे. तरी या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही . या रस्त्याचा खर्च कोणी करायचा असा प्रश्न शासकीय प्रशासनासमोर आहे.[ त्यामुळे तालुका दंडाधिकारी साहेब वणी यांनी हे काम आमचे नसून नगर पालिका प्रशासनाचे असल्याचे सांगतात .] [तर नगर पालिका प्रशासन सदर रस्ता नगर पालिकेच्या अखत्यारीत येत नसून त्या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे आहे असे मुख्याधिकारी यांचे म्हणणे आहे.] असे दादाजी पोटे यांनी सांगितले जेणेकरून रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे जीवित हानी होऊ नये यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे . आज सकाळपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्धनग्न आंदोलन केले या आंदोलनाला शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी भेट दिली नाही. अशातच वणी नगर परिषदेचे जबाबदार अधिकारी यांनी दादाजी पोटे याना आंदोलन मागे घेण्याकरिता पत्र देतो असे सांगून निघून गेले त्या पत्राची वाट पाहत होते व आपली फसवणूक झाली हे लक्षत येताच शेवटी वेळ झाल्यामुळे आंदोलक दादाजी पोटे निघून गेले. लोकशाही मार्गाने केलेल्या अर्धनग्न आंदोलनाची दखल शासनाच्या कुठल्याही विभागाने न घेतल्याचे दिसून आले मात्र पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी यांनी आपले कर्तव्य बजावले.परंतु पुन्हा आंदोलन करण्यात येईल जेणेकरून लोकशाहीच्या आंदोलनावरून नागरिकांचा विश्वास उडू नये म्हणून विविध प्रकारच्या आंदोलनाच्या मार्गाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करत राहू असे दादाजी पोटे यांनी सांगितले.