डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे शिक्षक दिन
नागपूर ( जयंत साठे ) :- मागासवर्गीय मुला मुलींच्या शिक्षणासाठी अधिकाअधिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या. त्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ मिळावा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी. त्यांचा निवासाचा व भोजनाचा प्रश्न सुटावा याकरीता तालुका, जिल्हा व विभागस्तरावर शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. सदर संस्थामध्ये कार्यरत असणारे गृहपाल, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे योगदान यासाठी मोलाचे ठरते. शाळा व वसतिगृहाचा दर्जा सुधारुन प्रवेशितांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने शासकीय संस्थामध्ये कार्यरत असणारे गृहपाल, मुख्याध्यापक व शिक्षक यांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विभागीय स्तरावर प्राविण्य पुरस्कार देण्यात येते.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे प्रादेशिक उपायूक्त, समाज कल्याण विभाग नागपूरद्वारे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांचे मार्फत नागपूर समाज कल्याण विभागातील गृहपाल, मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुरस्कार देऊन सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर तर उद्घाटक म्हणून डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर हे होते. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद कुळकर्णी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा, श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर, विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया इ.उपस्थित होते.
शिक्षकाने आपल्या शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, शिक्षकाने अद्यावत असले पाहिजे काल काय घडले, उद्या काय घडेल व परवा काय घडणार याविषयीची माहिती शिक्षकाला असायला हवी. आपल्या विभागाद्वारे कार्यरत शाळेत सर्व अद्यावत साधन सामुग्री आहे याचा लाभ विद्यार्थ्यांना करुन द्यावा. त्याचा योग्य प्रकारे वापर करुन विद्यार्थ्यांना शिकविले तरच आपल्या शाळा टिकून राहतील. आपले विद्यार्थी हुशार आहेत त्यांना रस्ता दाखविण्याचे काम आपले आहे. हे प्रत्येक शिक्षकाने जाणले पाहिजे असे आपले अध्यक्षीय भाषण करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांनी म्हटले.
आपल्या विभागाद्वारे कार्यरत शाळा या 24 तास आहेत. आपला भारत देश हा युवा देश आहे, युवा घडविण्यासाठी सर्व सोयी सुविधा आपण समाज कल्याण विभागाद्वारे पुरवित असतो. तंत्रज्ञानाचा वापर करुन येथे मुलांना शिकविले जाते. आपल्या विभागाच्या शाळा डिजिटल स्कुल आहेत. आज तंत्रज्ञानाचे जग आहे नवनवीन तंत्रज्ञान हे विकसित झाले आहेत. हे तंत्रज्ञान आपल्यापेक्षा लहान मुलांना जास्त समजते. त्यामुळे आम्हाला अधिक स्मार्ट वर्क करावे लागेल. आज स्किल बेस एज्युकेशन आहे. आपल्यालाही ते शिकले पाहिजे तरच आपण आपल्या मुलांना ते शिकवू व या शिक्षणातूनच विविध रोजगाराच्या संधीदेखील विद्यार्थ्यांना मिळेल. असे डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग यांनी उद्घाटकीय भाषण करतांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात उत्कृष्ट गृहपाल म्हणून केशव राहाटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गड्डीगोदाम, नागपूर, श्रीमती सुजाता पाटील, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह वर्धा, सावरबांधे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गोंदिया तर मुख्याध्यापक लक्ष्मी दांडेकर, अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, हैबतपूर ता. आर्वी जि. वर्धा, रविशंकर इठुले, अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, नंगपूर मुर्री, ता.जि. गोंदिया, बबीता हुमने, अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड, ता. बल्लारपूर, विलास गायकवाड, अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, वारेगाव, ता. कामठी, जि. नागपूर तर सहाय्यक शिक्षकांमध्ये श्रीमती रंजना गजाम, अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, वानाडोंगरी ता. हिंगणा, प्रियंका डांगेवार, अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, नवेगाव, ता.जि. गडचिरोली, लखनलाल मेश्राम, अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, हैबतपूर ता. आर्वी जि. वर्धा, लोकेश शिवणे, अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, राजदहेगाव जि. भंडारा यांचा पूरस्कृत करुन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद कूळकर्णी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वर्धा तर आभार प्रदर्शन श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर तर कार्यक्रमाचे संचालन श्रीमती सोनाली पाळेकर यांनी केले