शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा-
मैनाक घोष मुख्यकार्यकारी अधिकारी यवतमाळ
सुरेन्द्र इखारे वणी:-
माझे प्राथमिक शिक्षण बंगाली या मातृभाषेतून झाले आहे. इयत्ता सहावी पासून इंग्रजी विषयाची ओळख झाली. कोणतीही भाषा शिकण्यासाठी ती भाषा ऐकणे, पाहणे व चर्चा करणे आवश्यक आहे. मला आचार्य पदवी मिळविण्यासाठी एक ते दीड लाख प्रयोग करावे लागले. त्यातील दहा ते पंधरा प्रयोग यशस्वी झाले. त्यातून मला डॉक्टरेट मिळाली. अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांवर अनेक प्रयोग करावे लागतील. त्यातून तुम्ही यशस्वी व्हाल. त्यासाठी शिक्षकांनी आनंदी असायला पाहिजे. यातून प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मैनाक घोष यांनी केले. ते येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित भविष्यवेधी शिक्षण कार्यशाळेत उदघाटक म्हणून बोलत होते.
या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी किशोर गज्जलवार हे होते. या सोबत व्यासपीठावर विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे, सुरेश वणवे, प्राचार्य डॉ. सौजन्य मॅडम उपस्थित होते. प्रास्ताविक भाषण या कार्यशाळेचे आयोजक प्रकाश नगराळे यांनी करून या कार्यशाळेचे पार्श्वभूमी विशद करून वेध या शैक्षणिक चळवळी अंतर्गत वणी तालुक्यात मराठी शाळेतून दर्जेदार शिक्षण देण्याचा विचार मांडला. त्यानंतर अतिथींनी प्रसंगानुरूप शिक्षकांना मार्गदर्शन केले.
चार दिवसासाठी आयोजित या कार्यशाळेत जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण कसे असायला हवे, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे तयार करायला पाहिजे याचे प्रात्यक्षिकासह प्रत्यक्ष कृती या कार्यशाळेतून या कार्यशाळेचे सुलभक गजानन तुरारे, शंकर केमेकार, हर्षदा चोपणे, नेहा गोखरे करून घेणार आहेत. या सोबत या कार्यशाळे नंतर प्रत्येक सहभागी शिक्षकाकडून त्यांच्या शाळेचे व वर्गाचे नियोजन करून घेतल्या जाणार आहे.
या कार्यशाळेत 54 शिक्षक सहभागी झाले आहेत. या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधन व्यक्ती निशा चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन साधन व्यक्ती विनोद नासरे यांनी केले.