कंत्राटी नोकरभरती चा निर्णय दुर्दैवी!
*शासन निर्णय रद्द न झाल्यास जनआंदोलन अटळ – अरुणजी गाडे*
*महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा सरकारला इशारा*
नागपूर ( जयंत साठे ): कंत्राटी नोकर भरती चा निर्णय दुर्दैवी असून हा शासकीय निर्णय रद्द न झाल्यास जनआंदोलन अटळ आहे. असा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांनी सरकारला दिला आहे.
शासन नोकर भरतीसाठी नकारात्मकच असते असा सर्वसामान्य अनुभव असला तरीसुद्धा अनेक वर्षापासून सुशिक्षित बेरोजगार सरकारी नोकरी करिता रात्रीचा दिवस करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.महाराष्ट्र राज्यात सरकारी कर्मचारी/ अधिकारी यांचे 3 लाख पद रिक्त असून सुद्धा मागील अनेक वर्षापासून नोकर भरती नाही.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात लाखो तरुण बेरोजगार आहेत.नवीन कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू नाही. कंत्राटीकरणाच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांचे शोषण सुरू आहे.सरकारी शाळा खाजगी संस्थांना देणार आहेत.
भारतीय संविधानातील नागरिकांच्या हक्काची व कल्याणाचे सर्व पर्याय शासन हळूहळू कमी करत आहे.आता तर शासनाने राज्यातील शासकीय कर्मचारी आणि अधिकारी या पदावर ठेकेदारा मार्फत कर्मचारी भरतीचा निर्णय घेतलेला आहे.या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित बेरोजगार यांच्या भविष्याचे वाटोळे शासन करणार हे नक्की आहे.
सुशिक्षितांना – ना कायमचा रोजगार, ना सुरक्षित वेतन, ना पेन्शन, ना आरक्षण.कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही. त्यामुळे समाजातील कुटुंब व्यवस्था उध्वस्त होणार आहे.
आपण आता सावध होऊन शासनाचे निर्णया विरोधात लढा देणे गरजेचे आहे.हा लढा फक्त बेरोजगार तरुणांचा नाही तर प्रत्येक कुटुंबाचा आपल्या सर्वांचा आहे.आता खऱ्या अर्थाने जन आंदोलनाची गरज आहे.सर्व नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे कुटुंब, शेतकरी, सर्व सामाजिक संस्था,संघटना, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचारी-अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना यांनी जनआंदोलनात सहभागी होणे आवश्यक आहे.तरी जन आंदोलनात सहभागी होण्यास तयार राहावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने केले आहे.