दु:खमुक्तीकरिता बुध्दाच्या मार्गाचे पालन करा
सेवानिवृत्त सनदी अधिकारी शाम तागडे यांचे आवाहन
नागपूर जयंत साठे: तथागत बुद्धांनी मानवाच्या दुःखमुक्ती करिता आर्यसत्ये, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता सांगितलेल्या आहेत त्याचे पालन आपण करावे असे आवाहन सेवानिवृत्त सनदी अधिकारी शाम तागडे यांनी केले.
बहुजन हिताय संघाने लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित केलेल्या सभेत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. श्याम तागडे पुढे म्हणाले की, बुद्धाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी उमरेड तालुक्यातील राजुरवाडी येथे बारा एकर मध्ये धम्म प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येत असून या केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था केलेली आहे. याप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी डॉ. रमेश बल्लाळ यांनी जपान व इजिप्त मधील धम्मक्रांतीची माहिती दिली. तसेच त्यांनी मोझेस चे उदाहरण सुद्धा दिले.
अॅड. बी.जी. गजभिये व देविदास राऊत यांनी आपले स्वलिखित पुस्तके कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींना भेट दिले. सुरुवातीला तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना व 22 प्रतिज्ञा बदलून घेण्यात आल्या. या कार्यक्रमात दिनविशेष वाचन अॅड. हंसराज भांगे, सुक्तपठण बौद्धाचार्य देविदास राऊत, संचालन डॉ.शंकर खोब्रागडे तर आभार संजीव गाडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बहुजन हिताय संघाचे सभासद उपस्थित होते.