जैताई मातृगौरव पुरस्काराने डॉ. शंकरबाबा पापळकर सन्मानित.
धर्मकार्यासोबतच सामाजिक जाणिव जोपासण्याची जैताई देवस्थानची भूमिका
सुरेन्द्र इखारे वणी :- येथील सुविख्यात जैताई देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षी शारदीय नवरात्र उत्सवात, समाजसेवेला जीवन समर्पित करणाऱ्या मातृशक्तीला प्रदान करण्यात येणारा जैताई मातृगौरव पुरस्कार या तप:पूर्तीच्या वर्षात आज ललिता पंचमीच्या पावन मुहूर्तावर, शरीराने पुरुष असणाऱ्या,अनाथांचा नाथ, मातृ हृदयी अशा डॉ. शंकरबाबा पापळकर यांना देवीचे जेष्ठ उपासक सुधाकरराव पुराणिक यांच्या हस्ते , आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर जैताई देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार यांच्या सह आशुतोष शेवाळकर, किशोर साठे, चंद्रकांत अणे, गजानन कासावार , डॉ. प्रसाद खानझोडे, तुषार नगरवाला हे मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचा आरंभ अपर्णा देशपांडे, रेणुका अणे तथा प्रणिता पुंड सादर केलेल्या जगदंबा स्तवन, शारदा स्तवन आणि मातृगौरव गीताने झाला.
बाबांची अंधकन्या गांधारी हिने मोगरा फुलला हे गीत सादर केले.
प्रास्ताविकात देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी धर्मकार्यासोबत सामाजिक जाणीव जोपासण्याची देवस्थानची भूमिका विशद करीत पुरस्काराच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
गजानन कासावार यांनी सत्कार मूर्ती आणि त्यांच्या संस्थेच्या कार्याचा व्यापक परिचय करून दिल्यानंतर सुधाकर पुराणिक आणि मान्यवरांच्या हस्ते शंकर बाबा पापळकर यांना एक लक्ष रुपयाचा जैताई मातृगौरव पुरस्कार देऊन या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा गौरव करण्यात आला.
प्रमुख अतिथी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी हा पुरस्कार वणी नगरीसाठी अभिमानाचा विषय असून आज अत्यंत सुयोग्य व्यक्तीला तो प्रदान होत असल्याने निश्चितच पुरस्काराचा अधिकच गौरव झालेला आहे अशी भावना व्यक्त केली.
याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून गजानन कासावार यांचा तर विद्वत परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून डॉ .प्रसाद खानझोडे यांचा शंकर बाबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपल्या प्रसन्न आणि खुसखुशीत तरीही अत्यंत परिणामकारक मनोगतात डॉ शंकरबाबा पापळकर यांनी या जैताईच्या मंदिरात आपण सगळ्यांनी मिळून माझ्यासारख्या एका धोब्याचा केलेला सत्कार म्हणजे खऱ्या अर्थाने जातीयतेचा विलय करीत कार्याचा केलेला गौरव आहे अशी भावना व्यक्त केली.
जीवनात दुःख तर असणारच आहेत पण त्या दुःखाला हसत हसत सामोरे जायला हवे. आपल्या कार्याचा आधार त्याग असेल तर आपल्या सेवेची कदर होतेच असे ठासून सांगत, कोणीही थांबू नका कर्तव्य करणाऱ्याला जगात कोणीही अडवू शकत नाही. असा संदेश प्रदान केला.
संतश्रेष्ठ गुलाबराव महाराजांनी स्वतःला स्त्री समजत, मधुरा भक्ती करीत शेकडो ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचाच आदर्श समोर ठेवून मी मातृ हृदयाने आजवर केलेल्या कार्याचा हा गौरव आहे असे म्हणत पुरस्काराप्रती कृतज्ञता प्रकट केली.
रेणुका अणे यांनी सादर केलेल्या पसायदानाने सांगता झालेल्या या कार्यक्रमास लाभलेली वणीकरांची भरगच्च उपस्थिती निश्चितच उल्लेखनीय होती.