-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

अनाथांचे नाथ शंकर बाबा पापळकर यांचा आज मातृगौरव पुरस्काराने होणार सन्मान

अनाथांचे नाथ शंकर बाबा पापळकर यांचा आज मातृगौरव पुरस्काराने होणार सन्मान

सुरेन्द्र इखारे वणी:-  आज संपूर्ण भारतात बेवारस दिव्यांग मुलांचे मायबाप म्हणून वझ्झरचे शंकरबाबा पापळकर यांची ओळख आहे. वणी येथील जैताई देवस्थान तर्फे त्यांना मानाचा जैताई मातृगौरव पुरस्कार देण्यासाठी जैताई देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार, मंदिराचे संचालक तुषार नगरवाला, नगर वाचनालयाचे उपाध्यक्ष विशाल झाडे यांच्या सोबत जाण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्या सोबत बातचीत करतांना त्यांना अशा निःस्वार्थ सेवेसाठी मिळालेल्या प्रेरणेबद्दल तरुण भारत साठी मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी निःसंकोचपणे सांगितले की, दै. तरुण भारतचे संस्थापक संपादक ग. त्र्य. माडखोलकर यांच्या पासून अतिशय दर्जेदार वैचारिक अग्रलेखाच्या परंपरेमुळे माझी वैचारिक जडण घडण झाली. अशी प्रतिक्रिया अमरावती विद्यापीठाचे डी. लिट. पदवी प्राप्त शंकरबाबा पापळकर यांनी सांगितले.

गोपाल शिक्षण संस्था परतवाडा द्वारा संचालित स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाद्वारा बेवारस दिव्यांग मुलांना आणून त्यांचे पालनपोषण करणे. प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे त्यांचे पुनर्वसन करणारे शंकर बाबा हे जगातले एकमेव उदाहरण आहे. अस मानल्या जाते. वयाच्या 18 वर्षावरील दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी शासनाने कायदा करावा यासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे. घरातील आर्थिक परिस्थिती नुसार नियमित शाळेत न जाता आई- वडिलांना कपडे धुण्यासाठी मदत करणारे शंकरबाबा 10 वा वर्ग उत्तीर्ण होऊ शकले नाही. परंतु त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या संत गाडगेबाबायांच्या नावाने असलेल्या अमरावती विद्यापीठाने त्यांना मानद डी. लिट. पदवी देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.
बेवारस दिव्यांगाचे मायबाप शंकरबाबा
घरातील मोठा मुलगा असल्याने घरच्या कपडे धुण्याचा व्यवसायात गुंतल्याने ते शिकले नाही परंतु त्यांनी त्यांच्या भावाबहिणींना शिकवून मोठे केले. धोबी ते बेवारसांचे आधारस्तंभ असा मोठा जीवन प्रवास गाठणारे शंकरबाबांनी 1950 मध्ये कपडे धुणे बंद केले. 1954 मध्ये त्यांच्या आईला मुलगी मानणारे संत गाडगे बाबांची त्यांच्या वयाच्या 12 व्या वर्षी बहिरम यात्रेत भेट झाली. त्यांनी शंकरबाबाला चांगल्या लोकांसोबत रहा, आपल्या पायरीन रहा. असा जो उपदेश केला ते आजतागायत त्याप्रमाणे चालत आहेत. 20 डिसेंबरला गाडगेबाबांच्या मृत्यूआधी ते 13 मार्च 1956 ला त्यांना भेटायला गेले तेव्हा गाडगे बाबांनी यांना घोंगडी दिली. ती घोंगडी ते कार्यक्रमात जातांना खांद्यावर टाकून जातात. या घोंगडीमुळे त्यांना त्यांनी सुरू केलेल्या कामात ऊर्जा व गाडगे बाबांचे आशीर्वाद सोबत राहतात असा त्यांचा विश्वास आहे.

त्यानंतर मुंबईला जाऊन त्यांनी देवकी नंदन हे मासिक सुरू करून जवळजवळ 20 वर्ष ते संपादक होते. या दरम्यान त्यांची प्रत्येक क्षेत्रातील मोठया व्यक्तींशी संबंध आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असतांना त्यांना रिमांड होम मधील मुलं, मंदिर परिसरात, कचरा कुंडीत, नदी नाल्याच्या बाजूने टाकलेली मुले पाहून त्यांचे मन द्रवले अशा मुलांसाठी काम केलं पाहिजे या भावनेतून 1990 साली अमरावतीला येऊन पदमश्री प्रभाकर वैद्य यांच्या मदतीने काम सुरू केले. परतवाडा जवळ वझ्झर येथील डोंगरावर 25 एकर जागा विकत घेऊन 1992 पासून संस्थेची सुरुवात केली. त्यांनी नाशिक येथील कुंभ मेळ्यात टाकून दिलेली शीतल नावाची आंधळी, मुकी, बहुविकलांग मुलगी ही या आश्रमातील पहिली मुलगी आहे. त्यानंतर पंढरपूर येथील नदी पात्रातून व जळगाव येथील कचरा कुंडीत टाकलेली अशी चार मुले या आश्रमात आली. आतापर्यंत जवळपास 200 बेवारस मुलामुलींचे संगोपन शंकरबाबानी केले आहे. त्यापैकी 67 मुलांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. 12 मुलांना शासकीय नोकरी मिळाली आहे. या सगळ्या मुलांना शंकरबाबानी स्वतःचे नाव वडील म्हणून दिले आहे.
सन 2003 मध्ये शैलजा शंकरबाबा पापळकर नावाच्या मुलीच पाहिलं लग्न करून दिल. त्यानंतर मंजुश्रीच लग्न अस आतापर्यंत आश्रमातील 30 मुलांची लग्न बाबांनी समाजसहभागातून लावून दिली आहेत. लाजवंती या मतिमंद मुलीचे लग्न श्रीराम सरमोकदम या युवकाशी लावण्याआधी त्यांनी यवतमाळ येथील अनंत कवलीकर यांच्या कडे या मुलीला ठेवून लग्नानंतर सासरी कसे वागायचे याचे संस्कार करवून घेतले. या आश्रमातील दोन आंधळ्या मुलांनी 78 टक्के गुण घेऊन पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. हे मोठ्या अभिमानाने शंकरबाबा सांगतात. या आश्रमातील गांधारी नावाची आंधळी मुलगी तिच्या सुरेल गळ्यामुळे संगीताची बेताज बादशहा असल्याचे सांगून 2018 साली तिला लता मंगेशकर पुरस्कार देखील मिळाल्याचे सांगताना त्यांचे डोळे पाणावतात.
तरुण भारतचे माजी संपादक मा. गो. वैद्य यांचे मानसपुत्र असलेले शंकरबाबा सांगतात की मा. गो. मुळे कामात कर्मठता मिळाली. त्यांनी मला बौद्धिक संपदा देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला प्रसिद्धी दिल्याचेही सांगायला ते विसरत नाहीत.

त्यांनी आपल्या कुटुंबाशी पूर्णपणे नाते संबंध तोडून टाकले आहेत. मागील 25 वर्षांपासून एकाही कुटुंबातील व्यक्तीला ते साधे भेटले सुद्धा नाहीत. परंतु येथील बेवारस दिव्यांगाशी ते एकरूप झाले आहेत. या आश्रमातील 18 वर्षावरील दिव्यांगाविषयी ते अतिशय संवेदनशील आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अपंग कायदा 1957 नंतर यात परिस्थितीनुसार संशोधन झालेच नाही. सिकंदराबाद येथील मतीमंद राष्ट्रीय मानसिक विकलांग केंद्रात 18 वर्षांपर्यंतच्या मुलांवर संशोधन होते. परंतु बेवारस विकलांग वयाच्या 18 वर्षानंतर कुठे जातील त्यांनी काय करावं याविषयी कुठेही कायदा नाही. यांना संरक्षण नाही. अशा दिव्यांगाना आजीवन बालगृहात ठेवण्यासाठी परवानगी मिळावी. यांना स्वावलंबी होण्यासाठी शासनाने कायदा करावा यासाठी त्यांचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या बालगृहात बेवारस दिव्यांगाचे माझ्यानंतर काय होईल या विचाराने ते अतिशय अस्वस्थ होतात. या दिव्यांगाना आजीवन पालन पोषण करण्यासाठी शासनाने कायदा करावा यासाठी प्रत्येक स्तरावर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या कामात त्यांना यश मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना –  लेख (मुख्याध्यापक गजानन कासावार लिखित लेख)

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News