संतांना जातीत वाटले जाणे क्लेशदायक – डॉ. रवींद्र शोभणे.
सुरेन्द्र इखारे वणी :- ” समस्त मानवतेच्या कल्याणसाठी उपदेश आणि कार्य करणाऱ्या संतांना आपण जातीच्या चौकटीत बंदिस्त करतो ही अत्यंत क्लेशदायक गोष्ट आहे. वास्तविक महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्या कार्याचा परीघ वाढवत वारकरी संप्रदायाची ध्वजा पंजाबच्या घुमान मध्ये फडकवत ठेवणारे आणि शिखांच्या गुरुग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात आपल्या रचनांनी स्थान मिळवणारी श्री नामदेव महाराज आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे ” असे विचार अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.
जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्र उत्सवात विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या द्वारे आयोजित व्याख्यानात ” संत नामदेव ” या विषयावर ते व्यक्त होत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते यांच्या सह व्यासपीठावर आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, विलास मानेकर, माधव सरपटवार, प्राचार्य रमेश जलतारे, डॉ.दिलीप अलोणे, किशोर साठे, गजानन कासावार, राजाभाऊ पाथ्रडकर , डॉ. अभिजित अणे इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आरंभी प्रणिता पुंड, रेणुका अणे, अपर्णा देशपांडे, डॉ.अमृता अलोणे, राधा वैद्य यांनी जगदंबा स्तवन, शारदा स्तवन आणि मराठी गौरव गीत सादर केले.
प्रास्ताविकात देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी मंदिराचा तथा विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेचा इतिहास सांगत येथे चालणाऱ्या विशेष उपक्रमांची ओळख करून दिली.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ दिलीप अलोणे यांनी रवींद्र शोभणे यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या आरंभी विदर्भ साहित्य संघ, जैताई देवस्थान, नगर वाचनालय यासह विविध संस्था आणि व्यक्तींच्या द्वारे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेने वणीतील ख्यातनाम व्यापारी विजय चोरडिया यांना धर्मदाता पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा सर्व मान्यवरांच्याद्वारे सत्कार करण्यात आला.
आपल्या निरूपणात डॉ रवींद्र शोभणे यांनी त्यांच्यावर झालेल्या वारकरी संप्रदाय आणि तमाशा या दोन्ही परंपरांचे ऋण मांडत पंढरपूरच्या पांडुरंगा बद्दल असणाऱ्या विविध उपपत्तींचा उल्लेख केला. संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानदेवांचा तथा त्यांच्या भावंडांचा अनुबंध स्पष्ट करीत ज्ञानदेवांच्या समाधी प्रसंगी नामदेवांनी केलेल्या समाधीच्या अभंगांचा विशेषत्वाने उल्लेख करीत संतांच्या व्यापक दृष्टिकोनाला समोर ठेवले.
अध्यक्षीय मनोगतात प्रदीप दाते यांनी विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेच्या कार्य बाहुल्याचा आणि सातत्याचा विशेष गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी तर आभार राजाभाऊ पाथ्रडकर यांनी मानले . कार्यक्रमाची सांगता रेणुका अणे यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली. या कार्यक्रमाला
वणीकर नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.