लोकमान्य टिळक महाविद्यालयाची जैताई चरणी सांस्कृतिक वंदना.
सुरेन्द्र इखारे वणी :- साहित्य, संगीत, कला ही मानवी जीवनाची त्रिसूत्री. अभ्यासक्रमासोबतच या विविध गोष्टींमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारे प्रतिवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी युवा महोत्सवात आयोजित २७ पैकी १५ प्रकारात सादरीकरण केले. त्यापैकी मोजक्या सहा सादरीकरणांच्याद्वारे या विद्यार्थ्यांनी जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्रात अंतिम दिवशी आई जगदंबेला कलात्मक वंदना प्रस्तुत केली.
कार्यक्रमाच्या आरंभी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रमेश बोहरा, सचिव लक्ष्मण भेदी, संचालक समिती सदस्य अनिल जयस्वाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन कासावार, लॉयन्स संस्थेचे शमीम अहमद, श्रीवास्तवजी, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक अभिजित अणे , ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप अलोने या मान्यवरांनी नटराज पूजन केले.
प्रत्यक्ष सादरीकरणात आरंभीच निखिल वाघाडे याने सादर केलेल्या शास्त्रीय एकलनृत्त्याने अप्रतिम वातावरण निर्मिती केली.
त्यानंतर अंकिता भोयर हिने आशाताईंच्या आवाजातील जिवलगा राहिले रे दूर घर माझे हे गीत सादर केले. तिनेच मध्यंतरात मोगरा फुलला हे गीत देखील प्रस्तुत केले.
यानंतर सागर मुने यांच्या दिग्दर्शनात प्रस्तुत करण्यात आलेल्या आर्टिफिशल इंटेलिजन्स या एकांकिकेत गौरव नायनवार, मयंक शर्मा, चंचल मडावी, रजनी गारघाटे, गौरी ढेंगळे, सोनल सुरपाम ,समृद्धी ताकसांडे, निखिल वाघाडे, वैष्णवी निखाडे या कलाकारांनी सहभाग घेतला.
मानवी जीवनामध्ये भावनांचे महत्त्व आधारित करणाऱ्या या एकांकिकेने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले.
मयंक शर्मा याने गिटार वादनासह सादर केलेल्या पाश्चात्य संगीत प्रकारातील गीताने देखील श्रोत्यांची वाहवा मिळवली.
प्रहसन या कलाप्रकारात सागर मुने यांच्याच दिग्दर्शनात गौरव नायनवार,सोनल सुरपाम, समृद्धी ताकसांडे ,निखिल वाघाडे, वैष्णवी निखाडे आणि प्राची चंदेलकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रहसनाला विद्यापीठाच्या युवा महोत्सवात तृतीय क्रमांक प्राप्त झाला हे विशेष उल्लेखनीय.
तांत्रिक नियोजनाच्या मध्यंतरात तृप्ती जुमडे या विद्यार्थिनीने रखुमाई रखुमाई हे गीत सादर केले. चंचल मडावी याने लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा हा गोंधळ सादर केला. तसेच रजनी गारघाटे हिने दोन स्वरचित कविता सादर केल्या.
उपस्थितांच्या सर्वाधिक पसंतीला पात्र ठरलेला कलाविष्कार म्हणजे समूह नृत्य.
प्रियंका कोटनाके हिच्या दिग्दर्शनात राखी गोहणे, गौरी ढेंगळे,आचल ठावरी, संजना गोवारदीपे, चेतना गेडाम, प्राची चंदेलकर, पल्लवी वाभीटकर, रोहिणी मोहुर्ले, मोनिका जाधव ऐश्वर्या गोवारदीपे यांनी तमिळ संस्कृतीतील पारंपारिक नृत्य सादर केले. त्यात त्यांनी साधन स्वरूपात दीपकलश आणि टिपऱ्याचा केलेला उपयोग खरोखरच नयनरम्य होता.
या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आपल्याच गावातील आपल्याच कलाकारांचे कौतुक करणाऱ्या सादरीकरणाच्या शेवटी रमेश बोरा, लक्ष्मण भेदी आणि प्राचार्य डॉ .प्रसाद खानझोडे यांनी विद्यार्थ्यांचे आणि संयोजक डॉ. अभिजित अणे यांच्या प्रयासाचे मुक्तकंठाने कौतुक करीत शुभकामना प्रदान केल्या. सूत्रसंचालक डॉ अभिजित अणे यांनी या सर्व मान्यवरांचे तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के आणि जैताई देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार यांच्या विशेष सहकार्याबद्दल ऋणनिर्देशन केले.
विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी डॉ.नीलिमा दवणे तथा डॉ. सुनंदा अस्वले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या फेसबुक लाईव्ह चे तांत्रिक संचालन जयंत त्रिवेदी यांनी केले. संजय बिलोरिया यांनी त्यांना साह्य केले.
वणीकर नागरिकांचा पटांगणभर प्रतिसाद उस्फूर्त कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले ठरले.