शिवप्रभू तोंडात नव्हे हृदयात हवेत – तेजस्विनी गव्हाणे
सुरेन्द्र इखारे वणी :- “ जाणता राजा ” या सर्वार्थाने समर्पक विशेषणाने युक्त असणारी एकमेव विभूती, अनेक गुणांचा धनी छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचे आराध्य आहेत. महाराजांच्या केवळ नामोच्चारणाने अंगावर रोमांच उभे राहतात. आपण उच्चरवाने त्यांचे अभिवादन करतो पण शिवछत्रपतींचे नाव केवळ तोंडाने घेऊन उपयोग नाही तर त्यांच्या गुणांनी युक्त होऊन शिवप्रभू हृदयात विराजमान झाले पाहिजे. ” असे अत्यंत प्रभावी आणि जोशपूर्ण वर्णन युवा वक्ता तेजस्विनी गव्हाणे यांनी व्यक्त केले.
वणी येथील मित्र मंडळाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी या विषयावर ती व्यक्त होत होती. याप्रसंगी व्यासपीठावर मित्रमंडळाचे संस्थापक माधव सरपटवार, अध्यक्ष उत्तम गेडाम, सचिव विनय कोंडावार आणि डॉ अभिजित अणे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना डॉ. अभिजित अणे यांनी मैत्री कशी जपावी हे माधव सरपटवार यांच्याकडून शिकावे हे अधोरेखित करीत नव्या पिढीमध्ये वक्तृत्वाचे संस्कार रुजत असल्याचा आनंद व्यक्त केला.
राजाभाऊ पाथ्रडकर यांनी तेजस्विनी चा परिचय करून देत तिच्या आजवरच्या शौर्यकला प्रदर्शन आणि वक्तृत्वाचा आलेख सादर केला.
माधवराव सरपटवार यांनी मित्र मंडळाच्या निर्मितीपासून आजवर झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेत या २३ वर्षात १२ वैशिष्ट्यपूर्ण गमावल्याची खंत व्यक्त करीत त्यांना शब्द-श्रद्धांजली अर्पण केली.
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाची केवळ दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी असणाऱ्या तेजस्विनीने आपल्या अत्यंत ओजस्वी शैलीत, आत्मविश्वास पूर्ण सादरीकरणात छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध पैलूंमधून आपण दूरदृष्टी, व्यवस्थापन, जनसंपर्क, समूहकर्म, आत्मविश्वास, जागतिक प्रभाव, देवदेशप्रेम इ. गुणांना कसे अभ्यासू आणि अंगीकारू शकतो ते सांगत, वणीच्या समृद्ध वक्तृत्वपरंपरेची ती पुढील पाईक आहे हा विश्वास श्रोत्यांच्या मनामध्ये दृढ केला.
अध्यक्षीय मनोगतात उत्तमराव गेडाम यांनी दर्शन घ्यावे असे पाय दुर्लभ झाले आहेत असे सांगत वणीच्या समृद्ध परंपरेला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन मित्र मंडळाचे सचिव विनय कोंडावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे,राम मेंगावर आणि देवेंद्र भाजीपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.