*सीटू च्या आशा वर्करनी केली संविधान चौकात काळी दिवाळी साजरी*
जयंत साठे नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यु ) नागपूर जिल्हा कमिटी तर्फे संविधान चौकात काळे वस्त्र धारण करून लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी जुलै महिन्यापासून राज्याचे मानधन न मिळाल्यामुळे काळी दिवाळी साजरी केली. त्या उपलक्षामध्ये शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी विविध प्रकारच्या रांगोळ्या घालून व शेकडो दिवे लावून सरकारच्या चुकीच्या भूमिकेचा निषेध केला. मागील वर्षी सुद्धा दिवाळीच्या उपलक्षामध्ये आशा वर्कर यांच्या खात्यात मानधन आले नव्हते. परत यावर्षी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये मानधन आले नाही. त्यामुळे त्या दिवाळी कशी साजरी करणार? त्यामुळे सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत आज संविधान चौकात काळी दिवाळी साजरी करत आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी सरकारला चेतावणी दिली कि, या घटना दोन वर्षापासून घडत आहेत पुढील वर्षीच्या दिवाळीमध्ये घटना घडू नये व दर महिन्याला आशा वर्कर यांच्या खात्यामध्ये १ तारखेला पूर्ण मानधन करण्यात यावे. या आंदोलनाला प्रामुख्याने कॉ. राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, लक्ष्मी कोटेजवार, माया कावळे, कोमेश्वरी गणवीर, आरती चांभारे, कांचन बोरकर, रुपलता बोंबले, प्रतिमा डोंगरे यांचे सह शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तक रात्रभर उपस्थित होत्या.