राजस्थानच्या त्यागाचा आणि पराक्रमाचा इतिहास न शिकवणे हे दुर्दैव – प्रा.चेतना उपाध्याय
सुरेन्द्र इखारे वणी :- ” राजस्थानच्या बाहेरून रेताड वाटणाऱ्या भूमीच्या प्रत्येक काळात एकेका वीराच्या बलिदानाचे रक्त सांडलेले आहे. बाप्पा रावळ, राणा संग, राणा कुंभा, उदयसिंग, महाराणा प्रताप, राजसिंग यांच्या वीरत्वाचा, चूडावर सरदारांच्या पराक्रमाचा आणि महाराणी पद्मिनी, हाडाराणी चारुमती यांच्या महान त्यागाचा इतिहास न शिकवता, त्यांच्यावरच अनन्वित अत्याचार करणाऱ्या मोगलांचे गुणगान करणारा इतिहासच वर्षानुवर्ष शिकवणे हे आपले सगळ्यांचेच सर्वात मोठे दुर्दैव आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणणाऱ्यांनी गमावलेला हा आपला अभिमान अनपढ म्हणवल्या जाणाऱ्या लोकांनीच लोकगीतातून जोपासला आहे. ” असे अत्यंत परखड विचार प्रा. चेतना उपाध्याय यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ आणि नगर वाचनालय वणीच्या वतीने आयोजित माझं गाव माझा वक्ता या अभिनव शृंखलेच्या २७ व्या पुष्पात “धरती धोरा री ” या विषयावर त्या व्यक्त होत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघ वणीचे अध्यक्ष डॉ दिलीप अलोने तथा सचिव डॉ अभिजित अणे उपस्थित होते.
प्रास्ताविकात विदर्भ साहित्य संघ वणी चे उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी दोन्ही संस्थांचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आणि या व्याख्यानमालेच्या सातत्याचा विशेषत्वाने गौरव केला.
डॉ अभिजित अणे यांनी परिचय करून दिल्यानंतर चेतना उपाध्याय यांनी आपल्या अत्यंत शांत,संयत पण अभ्यासपूर्ण आणि मनोवेधक शैलीत आरंभी धोरा म्हणजे रेत के टिले असे सांगत त्यांची धरती असणाऱ्या राजस्थानची भौगोलिक संरचना स्पष्ट करून नंतर मोगलांना कधीही शरण न गेलेल्या मेवाड च्या देदीप्यमान इतिहासाला विविध अंगाने सादर केले.
हजारो वर्षांच्या सातत्यपूर्ण आक्रमणांना झेलणाऱ्या या प्रांतात आक्रमकांच्या अत्याचारामुळेच घुंगटप्रथा आणि सती प्रथेसारख्या गोष्टी नाईलाजाने स्वीकारल्या गेल्या हे अधोरेखित केले.
महाराणा प्रतापांचा रोमांचकारी इतिहास सांगताना पूजा भिल्ल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले अभूतपूर्व सहकार्य आणि आजही राणांचा आदर म्हणून जमिनीवर झोपणाऱ्या या लोकांच्या देशभक्तीला वंदन केले.
औरंगजेबाच्या धमकीला भीक न घालता आपल्या बांधवांच्या मदतीला धावणारे सलुंबर चे सरदार आणि त्यांची कुचंबणा लक्षात घेऊन सैनानी म्हणून स्वतःचे शीर कापून पाठवणारी हाडाराणी चारूमती च्या त्याग कथेने श्रोत्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले. प्रेमाचे हे उत्कट आणि त्याग पूर्ण पैलू न शिकवता आपण रडत बसणाऱ्या लैला मजनूच्या कथा वाचत राहिलो ही त्यांनी बोलून दाखवलेली खंत सगळ्यांनाच अंतर्मुख करून गेली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ दिलीप अलोने यांनी व्यक्त केलेल्या, आज जे श्रोते उपस्थित नव्हते ते खरोखरच दुर्दैवी आहेत या भूमिकेला प्रत्येकाने अनुमती दर्शविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मेंगावर, देवेंद्र भाजीपाले आणि प्रमोद लोणारे यांनी विशेष परिश्रम घेतले.