डॉ.बालचंद्र खांडेकर पालीचे भूषण होते- डॉ. पंकज चांदे
नागपूर ( जयंत साठे ):- डॉ. बालचंद्र खांडेकर हे पाली भाषेला समर्पित असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात पालीच्या विकासाचाच विचार केला. ते केवळ बोलणारे वक्ता नव्हते तर सर्वप्रथम तसे आचरण सुद्धा करणारे होते. तेच खरे पालीचे भूषण असल्यामुळे आमच्या विद्यापीठाद्वारे त्यांना पालीविभूषण ही उपाधी देण्यात आली असे विचार कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी व्यक्त केले. ते डॉ. आंबेडकर मिशन सभागृह, लष्करी बाग नागपुर येथे आयोजित डॉ. बालचंद्र खांडेकर अभिवादन सभेमध्ये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत शशिकांत हुमणे होते. आपल्या वक्तव्यात डॉ. चांदे म्हणाले की, डॉ. खांडेकरांमध्ये मी सच्चा मित्र पाहिला, सतत धडपडणारा कार्यकर्ता पाहिला. त्यांच्या निधनामुळे पालीच्या क्षेत्रात कार्य करणारा एक तेजस्वी तारा निखळला. अभिवादन सभेत अनेक मान्यवर व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रख्यात कवी ई. मो. नारनवरे यांनी डॉ. बालचंद्र खांडेकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांच्यातील गुणांचा गौरव केला. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ते सज्जनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटत असत. त्यांच्या पुस्तकातून अनेक वाईट चालीरिती, परंपरांविषयी परखड विचार व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. बी. डी. एस. पी. संघाचे डॉ.. बाबा वाणी यांनी डॉ. खांडेकर यांच्या स्मृतींना उजाळा देत म्हटले की, घरोघरी जाऊन धम्म शिकविला पाहिजे या मताचे प्रतिपादन आणि समर्थन ते सतत करीत असत.अशोक सरस्वती यांनी आपल्या संवेदना व्यक्त करताना म्हटले की, डॉ. बालचंद्र खांडेकर भौतिक स्वरूपाने आपल्यातून गेले असले तरी विचाराने ते अजूनही जिवंत आहेत. त्यांनी उभारलेला पालीचा लढा पूर्णत्वास जाईपर्यंत आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू. याप्रसंगी त्यांनी बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पाली भाषेच्या स्पर्धेमध्ये देण्यात येणारे प्रथम पारितोषिक डॉ. बालचंद्र खांडेकर या नावाने राहील असे जाहीर केले. याप्रसंगी आंबेडकराईट मुव्हमेन्ट फॉर कल्चर अँड लिटरेचरचे
डॉ. मच्छिंद्र चोरमरे, पाली – प्राकृत चे विद्यार्थी प्रतिनिधी अॅड. विजय धांडे, डॉ. नीलिमा चव्हाण, समता सैनिक दलाचे मार्शल अशोक बोदाडे, बहुजन हिताय संघाचे बौद्धाचार्य देविदास राऊत, पी. डब्लू. एस. महाविद्यालयाचे डॉ. सुदेश भोवते, प्रवीण मानवटकर, मुक्ती वाहिनीचे नरेंद्र शेलार, मुंबईचे प्रा. राहुल राव, पाली – प्राकृतच्या माजी विभाग प्रमुख डॉ. मालती साखरे, मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे आदी मान्यवरांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्यात. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नीरज बोधी यांनी केले तर सर्वांचे आभार ताराचंद्र खांडेकर यांनी मानले.