दाभा येथे संविधान दिन साजरा
नागपूर जयंत साठे ( जिल्हा प्रतिनिधी ):- दाभा येथे संविधान सन्मान उत्सव समितीच्या वतीने परिसरातील नागरिकांनी संविधान सन्मान दिन समारोहाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून फुले शाहू आंबेडकरी अभ्यासक उत्तम शेवडे यांनी सर्व भारतीयासाठी असलेली संविधानाची प्रसंगीता समजावून सांगितली.
यावेळी राहुल सोनटक्के, आकाश भारद्वाज, रामकिशोर रहांगडाले, शादाब खान, जीवन धारकर, प्रदीप डोंगरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते पत्रकार विजय खवसे व पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांना व गुणवंत विद्यार्थ्यांना उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप मेश्राम यांनी भारतीय संविधानाच्या फ्रेम केलेल्या प्रास्ताविका भेट म्हणून दिल्या.
राष्ट्रीय गायक राहुल अनविकर यांच्या भीम गीतांचा संगीतमय आंबेडकरी जलसा याप्रसंगी सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाला वाडी, लावा, दाभा, निलडोह, डीगडोह, वानाडोंगरी, हिंगणा परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे आयोजक संदीप मेश्राम यांनी तर समारोप शशीकांत मेश्राम यांनी केला.