पेपर तपासणी मुल्य व मानधन वाढविण्यासाठी
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे निवेदन
सुरेन्द्र इखारे वणी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्यातील सर्वच केंद्रावर काम करणाऱ्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधन व पेपर तपासणी मुल्यांमध्ये वाढ होण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने मागणी केली असून यासंदर्भातील लेखी निवेदन राज्य शिक्षण मंडळास सादर केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण मंडळामध्ये परीक्षा केंद्रावर काम करणारे केंद्रप्रमुख, उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, कारकून व सफाई कामगार आणि नियामक यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली नाही तसेच पेपर तपासणी करणा-या यंत्रणेतील समिक्षक व परीक्षक यांचे पेपर तपासणी मुल्य वाढविण्यात आले नाही. विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये मात्र भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे सध्याची महागाई लक्षात घेता केंद्रप्रमुख, उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, कारकून व सफाई कामगार आणि नियामक यांच्या मानधनामध्ये तसेच समिक्षक व परिक्षक यांचे पेपर तपासणी मुल्य वाढवावे याबाबतचे निवेदन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष /सचिव यांचेकडे अमरावती विभागीय शिक्षण मंडळामार्फत मंगळवार दि. २८ नोव्हेंबर २०२३ ला पाठविले आहे. निवेदन स्वीकारताना अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव तेजराव काळे व सादर करताना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे, अमरावती जिल्हाध्यक्ष दशरथ रसे, महानगर कार्यवाह अरविंद चौधरी, जिल्हा सहकार्यवाह गजेंद्र शेंडे व महानगर संघटक हर्षवर्धन देशमुख उपस्थित होते.पूणे येथील राज्य कार्यालयामध्ये विमाशिसंघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी स्वतः जाऊन शिक्षण मंडळाचे राज्य सहसचिव माणिक बांगर साहेब यांना ३० नोव्हेंबर २०२३ ला सादर केले.