बाबासाहेबांचे मुंबईतील निवासस्थान स्मारक बनावे !
नागपूर ( जयंत साठे ) :- दि ८ डिसेंबर – भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1912 ते 1934 पर्यंतचा उमेदीचा काळ शिक्षण, संघर्ष व आंदोलनात ज्या ठिकाणी घालवला तसेच 17 डिसेंबर 1919 ला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना जिथे भेट दिली ते मुंबई परळच्या बी आय टी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक बनले पाहिजे असे मनोगत दैनिक सार्वभौम राष्ट्रचे संपादक प्रेमरत्न चौकेकर व नागपुरातील आंबेडकरी अभ्यासक उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले.
प्रेमरत्न चौकेकर व उत्तम शेवडे हे मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा समिती परळ येथील अभिवादन सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी बावीस वर्ष निवास केला. ते ठिकाण राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी मागील बारा वर्षापासून ही प्रेरणा समिती कार्यरत आहे.
यापूर्वी 6 डिसेंबर 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या स्थळाला भेट देऊन राष्ट्रीय स्मारक घोषित केले होते. परंतु त्या कार्याला अजूनही विधिवत सुरुवात झाली नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार या सरकारने स्मारक बनवण्याची प्रक्रिया विनाविलंब सुरू करावी असे पाहुण्यांनी आवाहन केले.
या निवास स्थानाचे वैशिष्ट्य असे की बाबासाहेबांचे बहुतेक शिक्षण याच ठिकाणी झाले. यांच्या 4 मुलांचा जन्म व मृत्यू येथेच झाला. त्यांचे वडील व आत्या यांचेही निधन येथेच झाले. त्यांच्या पत्नी रमाई यांचा संपूर्ण जीवन संघर्षकाळ इथेच गेला. बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, गोलमेज परिषदा, बहिष्कृत सभा, नरेपार्क मधील सभा, दामोदर हॉल मधील बैठका येथेच राहून गाजवल्या. बाबासाहेबांच्या मूकनायकाची सुरुवातही येथूनच झालेली आहे.
प्रेरणा समितीने या निवासा शेजारी 4 डिसेंबरला दरवर्षी प्रमाणे अभिवादन सभेचे आयोजन केले होते. या अभिवादन सभेचे अध्यक्ष स्थानिक निवासी व बौद्धजन पंचायत समिती चे प्रमुख विलास तांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी अभ्यासक उत्तम शेवडे, दैनिक सार्वभौम राष्ट्रचे संपादक प्रा प्रेमरत्न चौकेकर, ओबीसी समाजातील महिला नेत्या दीपिका खळे, शांताराम आग्रे, गोविंद तांबे यांनी मार्गदर्शन केले. बहुतेक वक्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या संविधान व बहुजन समाज विरोधी भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव आफिक दफेदार यांनी, प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष शंकर लोखंडे यांनी तर समारोप विलास गायकवाड यांनी केला. राष्ट्रगीताने या सभेची सांगता झाली.
सभेपूर्वी उपस्थित पाहुण्यांनी बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या बी आय टी चाळ नंबर 1 मधील दुसऱ्या माळ्यावरील खोली क्र. 50 व 51 ला भेट देऊन तिथे सामूहिक त्रिशरण पंचशील घेतले. आयोजकांनी अभिवादन सभेला उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना सामूहिक भोजन दिले.