जागतिक एड्स दिन; महाविद्यालयात जनजागृती विषयक मार्गदर्शन, पोस्टर व तपासणी शिबिराचे रासेयोकडून आयोजन
सुरेन्द्र इखारे वणी :- कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. एड्स या आजारासंदर्भात सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, जगभरातून या आजाराचे समूळ नष्ट करणे व या आजारामुळे होणारे मृत्यू रोखणे आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या पीडितांना योग्य उपचार देणे महत्वाचे आहे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र, मारेगाव येथील सौं. संगीता वैद्य मॅडम यांनी एड्स होण्यामागील कारणे व त्यावरील उपाय योजना याबाबत सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. विनोद चव्हाण आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना एड्स रोगाविषयाचा इतिहास सांगितला तर प्रा. डॉ. एन. आर. पवार सरांनी आपल्या जीवनशैलीच्या माध्यमातून विविध रोगावर कशा पद्धतीने मात करता येईल याबाबत संवाद साधला.
एड्स दिनाचे औचित साधून पोस्टर्स स्पर्धा व एड्स तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर पोस्टर्स स्पर्धेत 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असता त्यात प्रथम क्रमांक कु. सायली असुटकर, द्वितीय क्रमांक कु. आचल किन्हेकार व तृतीय क्रमांक साहिल तायडे यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच 31 विद्यार्थ्यांचे एड्स तपासणी शिबिर घेण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप माकडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. गजानन सोडणर प्रा. डॉ. अनिल अडसरे, प्रा. भांदकर मॅडम उपस्थित होते.
सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विद्यार्थी व आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी मेहनत घेतली.