लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे सुयश
जिल्हास्तरीय अविष्कार २०२३ मध्ये पटकावली ३ पारितोषिके .
सुरेंद्र इखारे वणी :– महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळून त्यांच्यात नवनवीन उपक्रम निर्मितीची प्रेरणा जागृत व्हावी यासाठी प्रतिवर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे अविष्कार या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
२०२३ वर्षा करता यवतमाळ येथे संपन्न झालेल्या या जिल्हास्तरीय उपक्रमात वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तीन पारितोषिके प्राप्त केली आहेत.
पदव्युत्तरस्तरावर पूजा मुळे आणि ऋतुजा ठावरी यांनी सुकवलेल्या फुलापासून तयार केलेल्या भेटपत्रांना तथा शास्त्रीय पद्धतीने त्यांची जोपासना करणाऱ्या शोभेच्या वस्तूंना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
पदवी स्तरावर रजनी गारघटे हिने सर्व वनस्पतींची शास्त्रीय माहिती देण्यासाठी विकसित केलेल्या क्यू आर कोड उपक्रमाला विशुद्ध विज्ञान गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
पदवी स्तरावरच शेती आणि पशुपालन या गटात माशांच्या खवल्यांचे चूर्ण बनवून त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती सांगणाऱ्या संजना गोवारदीपे हिच्या सादरीकरणाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे तथा अविष्कार चमू समन्वयक डॉ. अजय राजूरकर तथा संघदीप उके यांच्या विशेष परिश्रमाने यश प्राप्त केलेली या विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.रवींद्र मत्ते यांच्यासह मनीष पेटकर, हेमंत मालेकर, मृणाली तराळे, शीतल पिंपळशेंडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया तथा प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी विजेत्यांचे अभिनंदन करीत जिल्हास्तरावर प्राप्त झालेले हे यश, अधिक प्रयत्न करून विद्यापीठ स्तरावर देखील प्राप्त करावे अशा शुभकामना प्रदान केल्या.