शिक्षण आणि शैक्षणिक संस्थांना समाजाभिमुख करणारे धोरण – डॉ. दीपक धोटे
सुरेंद्र इखारे वणी :- ” राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अत्यंत क्रांतिकारक कल्पना असून त्यामध्ये ज्या विविध अंगांना सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे त्यापैकी एक आहे समाजोमुखपद्धती. या धोरणाच्या द्वारे शिक्षण यंत्रणा आणि शैक्षणिक संस्था यांना अधिकाधिक समाजाभिमुख होऊन,समाजातील प्रश्नांना थेट समजून घेत,त्यावर समाधान सुचवणे आणि उपाययोजना करणे या गोष्टींना आता प्राधान्य द्यावे लागेल. नवीन शैक्षणिक धोरण त्यासाठी आधारभूत ठरेल .” असे प्रतिपादन अमरावती येथील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक धोटे यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या लोकनायक बापूजी अणे स्मृती व्याख्यानाच्या ५४ व्या वर्षीचे पुष्प गुंफताना ते “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि सामाजिकदायित्व ” या विषयावर व्यक्त होत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के संचालक उमापती कुचनकार तथा सुरेश शुक्ला आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे उपस्थित होते.
स्वागतपर मनोगतात सुभाष देशमुख यांनी व्याख्यानमालेच्या सातत्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रास्ताविक आणि परिचय करून देताना प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्व आणि अनिवार्यता सांगत वक्त्यांनी त्यातील प्रत्येक पैलूवर केलेल्या कार्याची विस्तृत ओळख करून दिली.
आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी निरूपणात डॉ. दीपक धोटे यांनी शैक्षणिक क्षेत्रात जागतिक स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांचे वर्णन करीत, निवडण्यात आलेल्या विविध १७ आंतरराष्ट्रीय प्रश्नांबद्दल शिक्षण क्षेत्राला काम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. आपल्या भागातील प्रश्नांना ओळखून त्यावर समर्पक उत्तर सादर करणे आणि आपल्या भागातील लोकविद्यांना जागतिक पातळीवर सुस्थापित करणे यासाठी शैक्षणिक संस्थांना काम करावे लागेल असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी करोना काळामुळे आपल्याला असे वेगळे चिंतन करण्याची संधी मिळाली आहे असे सांगत शिक्षण क्षेत्राने उपाय सुचवायला हवेत यावर भर दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मनोज जंत्रे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले.
याप्रसंगी विविध दानदात्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील यशाबद्दल घोषित केलेल्या अनेकविध पारितोषिकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.