“ऐसी कळवळ्याची जाती” चे प्रकाशन संपन्न.
सुरेंद्र इखारे वणी :- विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे कार्याध्यक्ष तथा नगर वाचनालय वणी चे अध्यक्ष माधव उपाध्य बाळासाहेब सरपटवार यांच्या ” ऐसी कळवळ्याची जाती ” या पुस्तकाचे एका हृद्य आणि कौटुंबिक सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले.
नगर वाचनालय वणीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणी चे अध्यक्ष डॉ दिलीप अलोणे , विमोचक विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड तथा विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ अभिजित अणे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना विदर्भ साहित्य संघाचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी प्रकाशन क्षेत्रातील वणी शाखेच्या वैभवशाली इतिहासाचा मागोवा घेतला.
विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांनी ग्रंथाचे विमोचन केल्यानंतर मानवी जीवनात पूर्वजांच्या वैभवशाली परंपरेला समजून घेण्याची आवश्यकता आणि त्यानुसार आचरण करण्याची इच्छा असणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या निमित्ताने वणी विभागाचा इतिहासच याच शब्दबद्ध केला आहे असे या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले. हे केवळ वाचून बाजूला ठेवण्याचे पुस्तक नसून यातील व्यक्तिमत्त्वांच्या गुणवैशिष्ट्याने आपण देखील भारावून जातो आणि आपल्याही जीवनावर ते संस्कार करतात त्यामुळे हा ग्रंथ आहे असे विशेषत्वाने प्रतिपादन केले.
याप्रसंगी सुनील इंदुवामन ठाकरे यांनी देखील पुस्तकातील व्यक्तिमत्वान बाबत त्यांच्या आयुष्यातील अनुभवांचे कथन केले.
आपल्या आयुष्यात आलेल्या या सर्व व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला घडविले असे सांगत त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांना हे अभिवादन आहे अशी भूमिका मांडत लेखक माधव सरपटवार यांनी आपल्या भावना व्यक्त करून पुस्तकातील “माझी जातीयवादी आई ” या लेखाचे वाचन करून उपस्थितांना सद्गद केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ दिलीप अलोणे यांनी आपल्या पूर्वजांबद्दल असा अभिमान बाळगत त्यानुसार आचरण करणारी व्यक्ती म्हणून सरपटवार सर आपल्या सगळ्यांच्या साठी आदरणीय आहेत असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या आरंभी श्री गंधेवार सर यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन कासावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे आणि राम मेंगावार यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाट पाहणारे डोळे या आपल्या पहिल्या पुस्तकानंतर माधव सरपटवार यांच्या या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन समयी सरपटवार कुटुंबीयांसह वणीतील अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.