वणीच्या रंगनाथ स्वामी यात्रा मैदानावर शंकरपटाचा धुराळा
शंकरपटात महिलांनी दाखविले शौर्याची चुणूक
शहरी व ग्रामीण भागातील शंकरपटाच्या शौकिनांची प्रचंड गर्दी
सुरेंद्र इखारे वणी :- वणी विधानसभा क्षेत्रातील वणी येथील रंगनाथ स्वामी यात्रा मैदानावर 26 वर्षांनंतर 64 टक्के कृषी क्षेत्र असलेल्या शेतकरी बांधवांसाठी विदर्भस्तरीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले.
शंकरपटाचे पहिल्याच दिवशी वणी विधानसभा क्षेत्रातील तसेच अन्य जिल्ह्यातून बैल जोड्यासह महिला पुरुष व आबालवृद्ध तसेच शंकरपटाचे शौकिनांनी हजेरी लावली.
या शंकरपटाचे आयोजक संजय खाडे व मित्रपरिवाराने वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधवाना मैदानी खेळ म्हणून शंकरपटाची मेजवानी दिली. आज दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोज सकाळी 10.30 वाजेपर्यंत “अ” गटात 25 जोड्या व “क” गटात 98 जोडयांनी नोंदणी केली होती. विशेष म्हणजे विदर्भातील कानाकोपऱ्यातुन बैलजोड्यांचा सहभाग दिसून आला. आज सकाळी एका जोडीने तर अक्षरशः 6 सेकंद 98 पॉईंट चे अंतर गाठले त्यामुळे हा सुध्दा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे उपस्थित प्रेक्षकांकडून बोलल्या जात होते.या ठिकाणी उपस्थित असलेल्या शंकरपटाचे शौकिनांनी बैल जोड्यांचे तसेच धुरकऱ्याचे कौतुक केले . या तीन दिवसीय विदर्भस्तरीय शंकरपटात राज्यातील पुणे, नागपूर, जालना, परभणी, नाशिक, हिंगोली ,जळगाव व वणी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातून पुरुषासह मुली व महिलांनी शंकरपटात सहभाग नोंदवून आपल्या शौर्याची चुणूक दाखविली होती . याप्रसंगी शंकरपटाचे सूत्रसंचालन संजय पेचे करीत होते. यावेळी व्यासपीठावर शंकरपटाचे आयोजक संजय खाडे, प्रशांत गोहोकार, राजाभाऊ पाथरडकर, पुरुषोत्तम आवारी, नागोराव आवारी, नारायण गोडे, डॉ भास्कर ढवस व समितीचे सदस्य उपस्थित होते.