Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedमातृभाषेचे वावडे ही चिंतनीय बाब - स्नेहलता चुंबळे

मातृभाषेचे वावडे ही चिंतनीय बाब – स्नेहलता चुंबळे

मातृभाषेचे वावडे ही चिंतनीय बाब – स्नेहलता चुंबळे

माझं गाव माझा वक्ता या अभिनव शृंखलेतील तीसावे पुष्प  

सुरेन्द्र इखारे वणी :-   ” अत्यंत संपन्न आणि समृद्ध असणाऱ्या आपल्या मराठी भाषेबद्दल आपल्याच मनात नसलेला अभिमान, प्रदीर्घ प्रयत्नानंतर देखील अभिजात भाषा घोषित न झाल्यामुळे होणारे दुष्परिणाम, प्राधान्याने इंग्रजी आणि इतर अनेक भाषांतून येणाऱ्या शब्दांना सरसकट स्वीकारत आपल्याच भाषेतील शब्दांची झालेली गळचेपी आणि आपल्याच मनामध्ये मराठीमध्ये बोलताना येणारा न्यूनगंड या सगळ्यांमुळे आजच्या मराठी मनालाच मराठी भाषेचे वावडे पहावयास मिळते ही अत्यंत चिंताजनक आणि चिंतनीय गोष्ट आहे.” असे विचार सेवानिवृत्त शिक्षिका स्नेहलता कमलाकर चुंबळे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रति महिन्यात आयोजित होत असलेल्या माझं गाव माझा वक्ता या अभिनव शृंखलेतील तीसावे पुष्प गुंफतांना त्या व्यक्त होत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद गजानन पुंड उपस्थित होते.
प्रास्ताविकात विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजित अणे यांनी विद्यालयात विज्ञान विषय शिकवणाऱ्या आणि इंग्रजी विषयात अभ्यास केलेल्या व्यक्तीच्या द्वारे मराठी व्यवहाराबद्दल व्यक्त होत असणारी ही चिंता महत्त्वपूर्ण आहे असे सांगत चुंबळे यांचे विषय निवडीबाबत अभिनंदन केले.
आपल्या मुद्देसूद आणि प्रभावी भाषणात चुंबळे यांनी विविध महापुरुषांनी मराठी भाषेच्या विषयी काढलेल्या गौरवोद्गागारांचा आढावा घेत सामान्य व्यवहारात आपण किती परकीय शब्द किंवा संकल्पना वापरत आहोत हे विविध उदाहरणांच्या द्वारे अधोरेखित केले. आपल्याला मराठी बोलणे वाचणे कमीपणाचे वाटत असेल तर तो आपल्या व्यक्तिमत्त्वातला दोष आपण दूर करायलाच पाहिजे असे आवाहन देखील केले.
अध्यक्षीय मनोगतात भाषा ही केवळ शब्दांचा खेळ नसून त्यातून मांडलेले विचार आणि होत असणारे संस्कार या व्यापक पातळीवर भाषेचा विचार व्हायला हवा. परकीय भाषेला विरोध नाही पण त्यासोबत येणारे परकीय विचार दूर करण्याची क्षमता विकसित व्हायला हवी. मराठीची समृद्ध संस्कार परंपरा आपण जोपासायला आणि वृद्धिंगत करायला हवी असे विचार विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे वणी शाखेचे सचिव डॉ. अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन गजानन भगत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments